विमानात तांत्रिक बिघाड, विमानतळावर सहा तास खोळंबले 114 प्रवासी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2017 01:20 PM2017-11-24T13:20:22+5:302017-11-24T14:57:51+5:30
एअर इंडियाच्या विमानातून जयपूरहून दिल्लीला जाणारे 114 प्रवासी गुरूवारी विमानात झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे तब्बल सहा तास विमानतळावर खोळंबले होते.
जयपूर- एअर इंडियाच्या विमानातून जयपूरहून दिल्लीला जाणारे 114 प्रवासी गुरूवारी विमानात झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे तब्बल सहा तास विमानतळावर खोळंबले होते. विमानातील तांत्रित बिघाडामुळे उशिर झाल्याने 30 प्रवाशांनी त्यांची तिकिट रद्द केली तर 84 लोकांनी ते विमान दुरूस्त होण्याची वाट पाहिली.
मिळालेल्या माहितीनुसार, पहिल्यांदा एअरक्राफ्टचं टायर खराब झाल्याचा रिपोर्ट आला. अधिकाऱ्यांनी सुरूवातीला हा रिपोर्ट खारीज केला पण काहीवेळानंतर समस्या सुरूच राहिल्याने टायर बदलण्याची परवानगी दिली. या बिघाडामुळे जयपूरहून दिल्लीसाठी दुपारी दीड वाजताचं विमान संध्याकाळी आठ वाजता निघालं.
सुत्रांच्या माहितीनुसार, विमानाचं टायर जयपूरमध्ये विमान लॅण्ड होताना पंक्चर झालं होतं. विमान टेक ऑफ करायचा आधी तपासणी सुरू असताना या बिघाडाबद्दल माहिती मिळाल्याचं एअरलाइन्स प्रशासनाने स्पष्ट केलं. टायरवर थोडे कट्स दिसल्याने ते बदलण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं.
विमानाचं टायर पक्चर झाल्याची कुठलीही घटना घडली नाही. एअर इंडियाचं विमान क्रमांक 491 टेक ऑफसाठी तयारी करत असताना स्टाफला टायरवर कट्स दिसले. त्यानंतर लगेचच टायर बदलण्यात आलं, अशी माहिती एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाचे मॅनेजर जयदीप सिंह बल्हारा यांनी दिली आहे.
आणखी वाचा : इंडिगोविरोधात देशद्रोहाचा गुन्हा, भारतीय चलन स्वीकारण्यास दिला नकार