११.५ कोटी पॅन कार्ड ठरले बाद, तुमचे सुरू आहे का?; आधार लिंकिंग न केल्याचा बसला फटका
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2023 08:17 AM2023-11-15T08:17:50+5:302023-11-15T08:18:43+5:30
पॅनला आधारशी लिंक करण्याची शेवटची तारीख या वर्षाच्या सुरुवातीला ३० जून रोजी संपली होती.
नवी दिल्ली : ११.५ कोटी पॅन कार्ड अंतिम मुदतीपर्यंत आधार कार्डशी लिंक न केल्यामुळे निष्क्रिय करण्यात आले आहेत. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) माहितीच्या अधिकाराच्या (आरटीआय) अर्जाला दिलेल्या उत्तरातून ही माहिती समोर आली आहे. पॅनला आधारशी लिंक करण्याची शेवटची तारीख या वर्षाच्या सुरुवातीला ३० जून रोजी संपली होती.
१ जुलै २०१७ नंतर ज्या पॅन कार्डधारकांना त्यांचे कार्ड मिळाले, त्यांचे आधार त्यांच्याशी आपोआप लिंक झाले. असे असले तरी, त्या तारखेपूर्वी पॅन कार्ड मिळाले होते त्यांनी ते लिंक करणे आवश्यक होते. भारतातील ७०.२४ कोटी पॅन कार्डधारकांपैकी ५७.२५ कोटी कार्डधारकांनी त्यांचे पॅन कार्ड आधारशी जोडले आहे. ११.५ कोटी निष्क्रिय केले गेले आहेत.
लिंक तपासण्यासाठी काय कराल?
- या लिंकचा वापर करून आयकर ई-फायलिंग पोर्टलला भेट द्या https://www.in- cometax.gov.in/iec/fo- portal/
- पेजच्या डाव्या बाजूला 'क्विक लिंक्सवर क्लिक करा. Link Aadhaar Status' वर क्लिक करा.
- तुमचा १० अंकी पॅन क्रमांक आणि १२ अंकी आधार क्रमांक नोंदवा.
- त्यानंतर 'View Link Aad haar Status वर क्लिक करा. तुमचा आधार क्रमांक आधीच लिंक केलेला असल्यास तो दाखवला जाईल. जर आधार लिंक नसेल, तर तुम्ही लिंक करण्यासाठी आवश्यक कृती करावी लागेल