बापरे! लोखंड खाण्याची सवय नडली, पोटातून काढले 116 लोखंडी खिळे अन् तुकडे
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2019 02:11 PM2019-05-14T14:11:57+5:302019-05-14T14:12:46+5:30
राजस्थानच्या बूंदी जिल्ह्यामध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या ठिकाणच्या एका व्यक्तीच्या पोटातून चक्क 116 लोखंडी खिळे, लोखंडाचे तुकडे आणि तारा आढळून आल्यामुळे डॉक्टरांनीही आश्चर्य व्यक्त केलं आहे.
बूंदी - राजस्थानच्या बूंदी जिल्ह्यामध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या ठिकाणच्या एका व्यक्तीच्या पोटातून चक्क 116 लोखंडी खिळे, लोखंडाचे तुकडे आणि तारा आढळून आल्यामुळे डॉक्टरांनीही आश्चर्य व्यक्त केलं आहे. सोमवारी डॉक्टरांनी या व्यक्तीचे ऑपरेशन करुन या वस्तू पोटातून बाहेर काढल्या. ऑपरेशननंतर सध्या या रुग्णाची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितले.
डॉक्टरांनी सांगितले की, पिडित भोला शंकर नावाच्या रुग्णाची मानसिक स्थिती खराब आहे. त्याच्या पोटात लोखंडी खिळे, तारा आणि लोखंडाचे तुकडे कसे आले याची कल्पना रुग्णाला नाही. कदाचित या रुग्णाला लोखंडाच्या वस्तू खाण्याची सवय लागली असावी त्यामुळे या वस्तू या माणसाने खाल्ल्या असतील असा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे.
भोला शंकर यांच्या वडिलांनी सांगितले की, 20 वर्षापासून माझ्या मुलाची मानसिक परिस्थिती खराब झाली आहे. मनोरुग्ण झाल्याने त्याने नोकरी सोडली. मागील काही दिवसांपासून त्याच्या पोटात दुखू लागल्याने त्याला डॉक्टरांकडे आणण्यात आले. डॉक्टरांनी जेव्हा त्याची तपासणी केली तेव्हा डॉक्टरांना धक्का बसला. सीटी स्कॅननंतर त्यांच्या पोटात खिळे, तुकडे आढळल्याचं समोर आलं. त्यानंतर डॉक्टरांनी ऑपरेशन करण्याचा सल्ला नातेवाईकांच्या वडिलांना दिला.
यावेळी डॉक्टर अनिल सैनी यांनी सांगितले की, भोला शंकरच्या पोटात जेव्हा आम्ही लोखंडी तारा, खिळे आणि तुकडे पाहिले तेव्हा आम्ही दंग झालो. यानंतर रुग्णाच्या नातेवाईकांना भोला शंकरवर ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला. जवळपास दिड तास हे ऑपरेशन करण्यात आलं. त्या दरम्यान पोटातील सर्व लोखंडी वस्तू बाहेर काढण्यात आल्या. यातील लोखंडी खिळ्याची लांबी 6.5 इंच इतकी आहे.