अमेरिकेतून बाहेर काढलेले ११९ भारतीय आज देशात परतणार; अमृतसरला विमान उतरवण्यावरुन वाद
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2025 17:55 IST2025-02-15T17:36:29+5:302025-02-15T17:55:14+5:30
बेकायदेशीर स्थलांतरितांविरुद्धच्या कारवाईचा भाग म्हणून डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने हद्दपार केलेले १२० भारतीय देशात परतणार आहेत.

अमेरिकेतून बाहेर काढलेले ११९ भारतीय आज देशात परतणार; अमृतसरला विमान उतरवण्यावरुन वाद
America Deport Indians: अमेरिकेतून हद्दपार केलेल्या ११९ बेकायदेशीर भारतीय स्थलांतरितांना घेऊन येणारे आणखी एक विशेष विमान शनिवारी रात्री अमृतसर विमानतळावर उतरणार आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या महिन्यात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतल्यानंतर भारतीयांना हद्दपार करण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी अमेरिकेचे लष्करी विमान भारतातील विविध राज्यांतील १०४ बेकायदेशीर स्थलांतरितांना घेऊन अमृतसरला पोहोचले होते. त्यानंतर आता हद्दपार केलेल्या भारतीयांचा दुसरा गट भारतात येणार आहे. हे विमान रात्री १० वाजताच्या सुमारास विमानतळावर उतरणार असल्याची माहिती समोर आली आहे.
अमेरिकेचे सी-१७ ग्लोबमास्टर हे लष्करी विमान सुमारे ११९ भारतीय नागरिकांना घेऊन शनिवारी रात्री अमृतसर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरणार आहे. बेकायदेशीर स्थलांतरितांविरोधातील कारवाईचा भाग म्हणून ट्रम्प प्रशासनाने या लोकांना हद्दपार केले आहे. यापूर्वी १०४ भारतीयांना घेऊन एक अमेरिकन विमान अमृतसरला पोहोचले होते. त्यावेळी त्यांच्या हाता पायात बेड्या अडकवण्यात आल्या होत्या. यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्रम्प यांच्या भेटीनंतर अमेरिकेतील बेकायदेशीर स्थलांतरितांवर भाष्य केलं होतं.
अमेरिकेतून हद्दपार होणाऱ्या ११९ बेकायदेशीर भारतीय स्थलांतरितांमध्ये सर्वाधिक ६७ लोक पंजाबमधील आहेत. दुसऱ्या क्रमांकावर हरियाणा आहे. हरियाणातील ३३ लोकांचा यामध्ये समावेश आहे. याशिवाय गुजरातमधील ८, उत्तर प्रदेशातील ३, गोवा, महाराष्ट्र आणि राजस्थानमधील प्रत्येकी दोन आणि हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमधील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे. शनिवारी रात्री दहाच्या सुमारास हे विमान अमृतसर विमानतळावर उतरण्याची शक्यता आहे.
पंजाबच्या मुख्यमंत्र्यांची टीका
दरम्यान, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी हे विमान अमृतसर विमानतळावर उतरवण्यावरुन प्रश्न उपस्थित केला आहे. केंद्र सरकार पंजाबची बदनामी करत असल्याचे भगवंत मान यांनी म्हटलं. हे विमान पंजाबमध्ये उतरवणे चुकीचे आहे. अमृतसरसारख्या पवित्र शहराला निर्वासन केंद्र बनवले जात आहे, असंही मुख्यमंत्री मान म्हणाले.
अमेरिकेतील अवैध स्थलांतरितांवर पंतप्रधान मोदींचे आवाहन
अमेरिकेत राहणाऱ्या बेकायदेशीर स्थलांतरितांना देश स्वीकारणार असल्याचे पंतप्रधान मोदींनी म्हटलं होतं. "हा केवळ भारताचाच प्रश्न नाही. ही जागतिक समस्या आहे. जे लोक बेकायदेशीरपणे इतर देशांमध्ये राहतात त्यांना तेथे राहण्याचा कायदेशीर अधिकार नाही. आम्ही अवैध स्थलांतरितांना परत घेण्यास तयार आहोत. पण ते आमच्यापुरते मर्यादित नाही. हे सामान्य कुटुंबातील लोक आहेत. त्यांना मोठमोठी स्वप्ने दाखवली जातात आणि दिशाभूल करून येथे आणले जाते. त्यामुळे मानवी तस्करीच्या या संपूर्ण व्यवस्थेवर आपण हल्ला केला पाहिजे. अमेरिका आणि भारताने मिळून अशा यंत्रणेला संपवण्याचा प्रयत्न केला पाहिजे जेणेकरून मानवी तस्करी संपुष्टात येईल," असं पंतप्रधान मोदी म्हणाले.