नवी दिल्ली हादरली: कोचिंग सेंटरच्या तळघरात २ मिनिटांत १२ फूट पाणी; ३ विद्यार्थी बुडाले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2024 05:16 AM2024-07-29T05:16:46+5:302024-07-29T05:17:44+5:30
‘आयएएस’ होण्याचे स्वप्न भंगले, ७ तासांनी मृतदेहच सापडले
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : महानगरात शनिवारी सायंकाळी झालेल्या जोरदार पावसामुळे जुने राजेंद्रनगर येथील राऊ आयएएस कोचिंग सेंटरच्या तळघरात पाणी शिरून ३ विद्यार्थ्यांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. कोचिंग सेंटरचे मालक अभिषेक गुप्ता आणि समन्वयक देशपाल सिंग यांना अटक करण्यात आली आहे.
सायंकाळी ७ वाजता माहिती मिळाल्यानंतर एनडीआरएफने बचाव मोहिम राबविली. मात्र, रात्री उशिरा ७ तासांनी उत्तर प्रदेशातील श्रेया यादव, तेलंगणातील तान्या सोनी आणि केरळमधील एर्नाकुलम येथील नवीन दालवीन या ३ विद्यार्थ्यांचे मृतदेहच हाती आले. दोरखंडाच्या सहाय्याने १४ जणांची सुटका करण्यात आली.
तळघर दाखवले ‘स्टोअर रूम’
राऊ कोचिंग सेंटरचे वाचनालय बेकायदेशीर कार्यरत होते. सेंटरने इमारतीच्या आराखड्यानुसार व अग्निशमन विभागाच्या एनओसीनुसार तळघर पार्किंगसाठी आणि स्टोअर रूम म्हणून वापरण्यात येत असल्याचे दाखवले होते. पण तिथे वाचनालय सुरू करण्यात आले होते.
दोर टाकले पण दिसलेच नाहीत...
शनिवारी रात्री इमारतीतील वीज खंडित झाल्याने तळघर वाचनालयाचे बायोमेट्रिक गेट जाम झाल्याने विद्यार्थी अंधारात अडकले. सुरुवातीला गेट बंद असल्याने तळघरात पाणी शिरले नाही, मात्र काही मिनिटांनी पाण्याचा दाब वाढून गेट तुटले. त्यानंतर तळघरात वेगाने पाणी भरू लागले. पाण्याचा जोर इतका होता की, पायऱ्या चढणे कठीण झाले. काही सेकंदातच गुडघाभर पाणी झाल्याने विद्यार्थी बाकावर उभे राहिले. परंतु अवघ्या २-३ मिनिटांत संपूर्ण तळघर १०-१२ फूट पाण्याने भरले. विद्यार्थ्यांना वाचवण्यासाठी दोर टाकण्यात आले, मात्र गढूळ पाण्यामुळे ते दिसले नाहीत.
मृतदेह पाहू न दिल्याने कुटुंबे संतप्त
आरएमएल रुग्णालयात दुर्घटनेतील मृतदेह पाहू न दिल्याने त्यांचे कुटुंबीय आणि मित्र संतप्त झाले. मृत श्रेया यादवचे काका धर्मेंद्र यादव यांनी सांगितले की, त्यांना वृत्तवाहिन्यांद्वारे घटनेची माहिती मिळाली. मी तिला कॉल करण्याचा प्रयत्न केला, पण तिचा फोन बंद होता. रुग्णालयात मला तिचा मृतदेह पाहण्याची परवानगी नव्हती.