तामिळनाडू, आंध्र प्रदेशात पुराचे १२ बळी, ३० बेपत्ता
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2021 06:04 AM2021-11-20T06:04:33+5:302021-11-20T06:05:04+5:30
मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांनी दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त करून मृतांच्या कुटुंबाला सानुग्रह अनुदान म्हणून प्रत्येकी ५ लाख रूपये आणि जखमींना प्रत्येकी ५० हजार रूपये जाहीर केले.
वेल्लोर (तमिळनाडू) : तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशमध्ये जोरदार पावसामुळे घडलेल्या दुर्घटनांत १२ जण ठार, ९ जण जखमी आणि ३० जण बेपत्ता झाले आहेत. तामिळनाडूत घर कोसळून ४ मुले, ४ महिलांसह ९ जण ठार तर ९ जण जखमी झाले. ही दुर्घटना शुक्रवारी पहाटे साडेसहाच्या सुमारास वेल्लोर जिल्ह्यातील पिरनामपट्टू भागात घडली, असे पोलीस म्हणाले.
दरम्यान, मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांनी दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त करून मृतांच्या कुटुंबाला सानुग्रह अनुदान म्हणून प्रत्येकी ५ लाख रूपये आणि जखमींना प्रत्येकी ५० हजार रूपये जाहीर केले. गेल्या आठवड्यापासून राज्यात जोरदार पाऊस होत असल्यामुळे अनेक जिल्ह्यांत शाळा बंदच आहेत.
रस्त्यावर पुराचे कमरेपर्यंत पाणी वाहात होते. त्यामुळे काही कुटुंबांनी रात्र घराच्या गच्चीवर काढली. मृतांचे कुटुंब तळमजल्यावर राहात
होते.
आंध्र प्रदेशात ३ ठार
कडापा : आंध्र प्रदेशमधील कडापा जिल्ह्यात शुक्रवारी पुरात ३ जणांचा मृत्यू झाला तर ३० जण बेपत्ता आहेत. धरण फुटल्यामुळे चेय्येरू नदी दुथडी भरून वाहिली आणि अनेक खेड्यांत पाणी शिरले. नंदालूरमधील स्वामी आनंदा मंदिरही पाण्यात बुडाले. कार्तिक पोर्णिमेनिमित्त शंकराच्या मंदिरात जमलेले भाविक पुराच्या पाण्यात अडकले.