दिल्लीहून रस्त्याने १२ तासांत मुंबईत पोहोचा! नवा एक्स्प्रेस-वे, तीन वर्षांत पूर्ण होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 11:29 PM2018-04-17T23:29:53+5:302018-04-17T23:29:53+5:30
राजधानी दिल्ली व आर्थिक राजधानी मुंबई या शहरांना रस्त्याने अतिवेगवान प्रवासासाठी पूर्णपणे नवा एक्स्प्रेस-वे बांधण्याची योजना केंद्रीय महामार्ग व रस्ते वाहतूक मंत्रालयाने आखली असून तो पूर्ण झाल्यावर अवघ्या १२ तासांत दिल्लीहून मुंबईला पोहोचणे शक्य होईल.
नवी दिल्ली : राजधानी दिल्ली व आर्थिक राजधानी मुंबई या शहरांना रस्त्याने अतिवेगवान प्रवासासाठी पूर्णपणे नवा एक्स्प्रेस-वे बांधण्याची योजना केंद्रीय महामार्ग व रस्ते वाहतूक मंत्रालयाने आखली असून तो पूर्ण झाल्यावर अवघ्या १२ तासांत दिल्लीहून मुंबईला पोहोचणे शक्य होईल. सध्या या प्रवासास रस्त्याने २४ तास तर रेल्वेने २० तास लागतात.
भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितिन गडकरी यांनी सांगितले की, या एक्प्रेस-वेला सुमारे एक लाख कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. डिसेंबरपासून त्याचे काम सुरू होईल व तीन वर्षांत ते पूर्ण करण्याची योजना आहे. महत्त्वाच्या व खूप रहदारीच्या मार्गांवर फक्त सध्या अस्तित्वात असलेले महामार्ग आणखी रुंद करणे पुरेसे नाही. त्यामुळे नवे महामार्ग बांधण्याचे मंत्रालयाचे धोरण आहे. दिल्ली-मुंबई एक्प्रेस-वेही त्यानुसारच बांधण्यात येणार आहे. यासाठी ४० ठिकाणी एकाचवेळी बांधकाम सुरू होईल. सध्याच्या राष्ट्रीय महामार्ग ८ ने गेल्यास दिल्ली-मुंबई अंतर १,४५० किमी आहे. या प्रवासास २४ तास लागतात. नव्या एक्क्प्रेस-वेने हे अंतर १,२५० किमी असेल. हा प्रवास १२ तासांत करता येईल. या एक्स्प्रेस-वेची सुरुवात गुरगावच्या राजीव चौकातून होईल. दिल्ली, मेवात, कोटा, रतलाम, गोधरा, सुरत, दहिसर व मुंबई असा त्याचा मार्ग असेल. हरियाणातील मेवात व गुजरातमधील दाहोद दोन सर्वात मागास जिल्ह्यांतून तो जाईल.
मागास भागांच्या विकासाला मिळणार चालना
हा नवा एक्स्प्रेस-वे मागास आणि अविकसीत भागांतून काढणार
असल्याने भूसंपादनाचा खर्च कमी येईल. संपूर्ण एक्स्प्रेस-वेच्या भूसंपादनासाठी ५० ते ६० अब्ज रुपये लागतील, अशी अपेक्षा असल्याचे गडकरी म्हणाले. हा मार्ग जाणार असलेले भाग सध्या मागास असले तरी एक्स्प्रेस-वेमुळे औद्योगिक व व्यापारी विकासाला चालना मिळून मोठे रोजगार उपलब्ध होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.