जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा सुरक्षा दलांवर ग्रेनेड हल्ला; १२ नागरिक जखमी

By कुणाल गवाणकर | Published: November 18, 2020 09:24 PM2020-11-18T21:24:15+5:302020-11-18T21:24:41+5:30

दहशतवाद्यांचा निशाणा चुकल्यानं रस्त्यावरच ग्रेनेडचा स्फोट; सुरक्षा दलांकडून परिसरात सर्च ऑपरेशन सुरू

12 injured as militants throw grenade at security personnel in Jammu kashmirs Pulwama | जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा सुरक्षा दलांवर ग्रेनेड हल्ला; १२ नागरिक जखमी

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा सुरक्षा दलांवर ग्रेनेड हल्ला; १२ नागरिक जखमी

Next

श्रीनगर: जम्मू-काश्मीरच्या काकापोरामध्ये दहशतवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) आणि पोलिसांच्या संयुक्त पथकावर ग्रेनेड हल्ला केला आहे. यामध्ये १२ जण जखमी झाले आहेत. दहशतवाद्यांनी सीआरपीएफ आणि पोलिसांच्या दिशेनं फेकलेल्या ग्रेनेडचा निशाणा चुकला. त्यामुळे रस्त्यावरच ग्रेनेडचा स्फोट झाल्याची माहिती एएनआय वृत्तसंस्थेनं पोलीस अधिकाऱ्यांच्या हवाल्यानं दिलं आहे. 

दहशतवाद्यांच्या ग्रेनेड हल्ल्यात १२ नागरिक जखमी झाले. त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी परिसरात तातडीनं हल्लेखोरांचा शोध सुरू केला. गेल्या सोमवारी कुलगाम जिल्ह्यातल्या पोलीस चौकीवर दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला होता. सुदैवानं त्या हल्ल्यात कोणीही जखमी झालं नव्हतं. त्यावेळीही दहशतवाद्यांनी डागलेल्या ग्रेनेडचा निशाणा चुकला होता. ग्रेनेड पोलीस ठाण्याच्या बाहेर पडल्यानं मोठी जीवितहानी टळली.




काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांच्या कारवाया सुरू असताना सीमेपलीकडून पाकिस्तानची आगळीक सुरूच आहे. आज पाकिस्तानी सैन्यानं संध्याकाळी सव्वा सहाच्या सुमारास शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. पाकिस्ताननं पुंछ जिल्ह्यातल्या शाहपूर आणि करणी सेक्टरमध्ये गोळीबार केला. गेल्या आठवड्यात पाकिस्ताननं केलेल्या गोळीबारात भारताचे ५ जवान शहीद झाले. त्यानंतर भारतानं जोरदार प्रत्युत्तर देत पाकिस्तानचे बंकर, लॉन्चिंग पॅड्स उद्ध्वस्त केले. यामध्ये पाकिस्तानचे ११ सैनिक मारले गेले.

Web Title: 12 injured as militants throw grenade at security personnel in Jammu kashmirs Pulwama

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.