१२ मंत्र्यांना भोवले वाद

By admin | Published: July 7, 2016 04:05 AM2016-07-07T04:05:43+5:302016-07-07T04:05:43+5:30

केंद्रीय मंत्रिमंडळात दुसऱ्यांदा फेरबदल करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन वर्षांतील कामगिरीच्या आधारावर तब्बल १२ केंद्रीय मंत्र्यांचे खातेपालट करून मला कोणीही गृहीत धरू नका, असा

12 ministers plead guilty | १२ मंत्र्यांना भोवले वाद

१२ मंत्र्यांना भोवले वाद

Next

- हरीश गुप्ता, नवी दिल्ली

केंद्रीय मंत्रिमंडळात दुसऱ्यांदा फेरबदल करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन वर्षांतील कामगिरीच्या आधारावर तब्बल १२ केंद्रीय मंत्र्यांचे खातेपालट करून मला कोणीही गृहीत धरू नका, असा स्पष्ट संदेशच दिला आहे. त्यांनी दहा राज्यांतील १९ नवीन चेहऱ्यांना संधी देताना, पाच मंत्र्यांना वगळले असले तरी या धक्क्याचा अनेक केंद्रीय मंत्र्यांवरही परिणाम झाला आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात अजिबात संघर्ष नको, असे संकेतही पंतप्रधानांनी दिले आहेत.
संसदीय कामकाजमंत्री म्हणून त्यांनी अनंतकुमार यांच्यावर जबाबदारी सोपविली आहे. व्यंकय्या नायडू यांच्या आक्रमकतेच्या तुलनेत अनंतकुमार मृदू आहेत. त्यामुळे फ्लोअर मॅनेजमेंट सोपे होईल, असा त्यांचा होरा असावा. तथापि, अरुण जेटली यांच्याकडील माहिती व प्रसारण खाते नायडू यांच्याकडे देण्यात आले. अधिवेशनात वस्तू आणि सेवाकर (जीएसटी) विधेयक संमत करून घेण्याचा पंतप्रधानांचा इरादा आहे. ते आतापर्यंत करून घेण्यात जेटली यांचे प्रयत्न कमी पडले होते.

कमी महत्त्वाची खाती देऊन प्रसंगी पुढच्या वेळी तुमचीही गच्छंती केली जाईल, असे संकेत पाच राज्यमंत्र्यांना देण्यात आले आहेत.

खातेपालटामागची कारणमीमांसा...
स्मृृती इराणी : पदवी, जेएनयू, रोहित वेमुला आत्महत्या आदी प्रकरणांशी संबधित वादामुळे मनुष्यबळ विकास हे वजनदार खाते काढून घेऊन स्मृती इराणी यांच्याकडे वस्त्रोद्योग खाते देऊन त्यांना पदावनत करण्यात आले. जवळीक नव्हे तर कामगिरीच पाहिली जाईल, असे संकेतही देण्यात आले आहेत.

सदानंद गौडा कामगिरीचा आलेख घसरल्याने सदानंद गौडा यांचे कायदा खाते काढून त्यांना कायदा व सांख्यिकी आणि अंमलबजावणी खाते देण्यात आले.

वीरेंद्र सिंह : सर्वात मोठा धक्कादायक बदल म्हणजे वीरेंद्र सिंग यांच्याकडील ग्रामीण विकास, स्वच्छता, पेयजल, पंचायत राज खाते काढून त्यांच्याकडे पोलाद खाते देण्यात आले. त्यांच्याकडे चार मंत्रालये होती. आता फक्त पोलाद (खाण वगळून) खाते देण्यात आले, तर बढती न करता पीयूष गोयल यांच्याकडे खाण या खात्याचा अतिरिक्त प्रभार देत त्यांचे समाधान करण्यात आले आहे.

रविशंकर प्रसाद : कॉल ड्रॉप्स समस्येमुळे रविशंकर प्रसाद यांना महत्त्वाचे दळणवळण मंत्रालय गमवावे लागले असले, तरी माहिती व तंत्रज्ञान कायम ठेवून कायदा मंत्रालयाचा अतिरिक्त प्रभार देत त्याची भरपाई करण्यात आली आहे.

राजीव प्रताप रुडी : कौशल्य विकासमंत्री राजीव प्रताप रुडी यांनाही कामगिरीची मोजपट्टी लावत संसदीय कामकाज या खात्याचा अतिरिक्त प्रभार गमवावा लागला.

जन. व्ही. के. सिंग : भलतेसलते बोलून स्वत:सह सरकारलाही अडचणीत आणणारे जन. व्ही. के. सिंग यांनाही सांख्यिकी, अंमलबजावणी खात्याच्या स्वतंत्र प्रभार गमावून किंमत मोजावी लागली. आता त्यांच्या सोबतीला ए. जे. अकबर यांचाही विदेश राज्यमंत्री म्हणून समावेश करण्यात आल्याने सिंग यांना स्वभावाला मुरड घालावी लागेल.

संतोष गंगवार : गंगवार यांच्याकडे वस्त्रोद्योग खात्याचा स्वंतत्र प्रभार होता. त्यांना आता अरुण जेटली यांच्या हाताखाली वित्त मंत्रालयात पाठवून मोठा धक्का दिला आहे.

शहा यांचा वरचष्मा!
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात भाजप अध्यक्ष अमित शहा यांचा वरचष्मा दिसून आला. विस्ताराबाबत महिनभरापासून खलबते चालली असली तरी यावेळी पंतप्रधान मोदी हे नव्याने केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश करण्यात आलेल्या एकाही मंत्र्यांला भेटले नाहीत. या नव्या मंत्र्यांना भेटण्याची जबाबदारी पंतप्रधानांनी अमित शहा यांच्यावर सोपविली होती. नंतर अरुण जेटली यांनी शहा यांच्याशी चर्चा केली; परंतु या सर्व घडामोडीत पंतप्रधान मोदी पडद्याआडच राहिले.

Web Title: 12 ministers plead guilty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.