रायगडमधील दिघीसह राज्यात १२ नव्या औद्योगिक वसाहती; केंद्रीय मंत्रिमंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2024 06:42 AM2024-08-29T06:42:28+5:302024-08-29T06:42:59+5:30
नॅशनल इंडस्ट्रियल कॉरिडॉर डेव्हलपमेंट प्रोग्रॅमच्या (एनआयसीडीपी) अंतर्गत ही कामे करण्यात येतील, असे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातल्या दिघीसह विविध ठिकाणी १२ औद्योगिक वसाहती उभारण्याच्या निर्णयाला केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी मंजुरी दिली. दहा राज्यांत राबविण्यात येणाऱ्या या योजनेसाठी २८,६०२ कोटी रुपये खर्च होणार आहेत. या योजनेसाठी सहा कॉरिडॉरचीही आखणी करण्यात आली आहे.
खुरपिया (उत्तराखंड), राजपुरा-पटियाला (पंजाब), पलक्कड (केरळ), आग्रा, प्रयागराज (उत्तर प्रदेश), गया (बिहार), झहीराबाद (तेलंगण), ओरवाकल, कोपर्थी (आंध्र प्रदेश) व जोधपूर-पाली (राजस्थान) येथेही नव्या औद्योगिक वसाहती उभारण्यात येणार आहेत. नॅशनल इंडस्ट्रियल कॉरिडॉर डेव्हलपमेंट प्रोग्रॅमच्या (एनआयसीडीपी) अंतर्गत ही कामे करण्यात येतील, असे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
दहा लाख थेट, ३० लाख अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध
एनआयसीडीपी योजनेमुळे विविध शहरे ही आधुनिक औद्योगिक सुविधांनी सज्ज करण्यात येतील. त्यामुळे उद्योगधंद्यांच्या विकासाला मोठा हातभार लागेल. या योजनेद्वारे १० लाख थेट रोजगार व ३० लाख अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होण्याची शक्यता आहे. नव्या औद्योगिक वसाहतींमुळे १.५२ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होण्याची शक्यता आहे.