Lockdown : 12 वर्षांची चिमुकली 100 किमी पायी चालली, घर काही अंतरावर असतानाच झाला मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2020 12:02 PM2020-04-21T12:02:55+5:302020-04-21T12:18:06+5:30
जमालो मडकाम ही काही नातलगांसह 2 महिन्यांपूर्वी मिरची तोडण्यासाठी तेलंगणातील पेरूर या गावी गेली होती. लॉकडाऊन-2 नंतर 16 एप्रिलला ही चिमुकली आपल्या 11 नातलगांसह तेलंगणाहून परत आपल्या गावी येण्यासाठी निघाली होती.
बिजापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. असे असतानाच हृदय पिळवटून टाकणारी एक घटना छत्तीसगडमधील बिजापूरमध्ये घडली आहे. येथील एक 12 वर्षांची चिमुकली आपल्या काही नातलगांसह तेलंगणातील पेरूर गावी कामासाठी गेली होती. मात्र, लॉकडाऊन-2 नंतर ती गावातीलच आपल्या 11 नातलगांसह तेलंगणाहून बिजापूरच्या दिशेने निघाली. सतत 3 दिवस पायी प्रवास करून ती बिजापूर जिल्ह्यातील मोदकपाल भागात पोहोचली. येथे डिहायड्रेशनमुळे तिचा मृत्यू झाला. या मुलीचा जेथे मृत्यू झाला तेथून तिचे घर केवळ 14 किलोमीटर अंतरावर होते. जमालो मडकाम , असे या चिमुकलीचे नाव आहे.
जमालो मडकाम ही काही नातलगांसह 2 महिन्यांपूर्वी मिर्ची तोडण्यासाठी तेलंगणातील पेरूर या गावी गेली होती. लॉकडाऊन-2 नंतर 16 एप्रिलला ही चिमुकली आपल्या 11 नातलगांसह तेलंगणाहून परत आपल्या गावी येण्यासाठी निघाली. ती जवळपास 100 किलोमीटर पायी चालली. हे 12 जण 18 एप्रिलला बिजापूरमधील मोदकपाल येथे पोहोचले होते.
या घटनेनंतर सुरक्षितता म्हमून प्रशासनाने या सर्व मजुरांना क्वारंटाइन केले आहे. आपल्या एकुलत्या एक मुलीच्या मृत्यूची बातमी समजताच वडील आंदोराम मडकाम आणि आई सुकमती मडकाम जिल्हा रुग्णालयात पोहोचले. मृत्यूच्या तीन दिवसांनंतर आज संबंधित मुलीचे शवविच्छेदन झाले. यानंतर तिचा मृतदेह तिच्या कुटुंबीयांना सोपवण्यात आला. जमालोच्या वडिलांनी सांगितल्यानुसार, जमालोला उल्टी-जुलाब झाले, तिच्या पोटातही दुखत होते.
बिजापूर येथील मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. बीआर पुजारी यांनी सांगितले, तेलंगणाहून पायी आलेल्या मजुरांच्या गटातील एका मुलीचा मृत्यू झाला असल्याचे समजताच संबंधित मुलीचा मृतदेह बिजापूर येथे आणण्यात आला. तसेच तिच्यासोबत असलेल्या सर्वांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. सुरक्षितता मंहणून संबंधित मुलीचे सॅम्पलदेखील कोरोना टेस्टसाठी पाठवण्यात आले आहे. याचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. गर्मीमुळे शरिरातील इलेक्ट्रॉल इम्बॅलेन्स अथवा पाण्याच्या कमतरतेमुळे तिचा मृत्यू झाला आहे. मात्र, शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच तिच्या मृत्यूचे खरे कारण कळू शकेल.