मोदींमुळे 'त्या' 12 वर्षाच्या मुलाला मिळणार जीवदान
By admin | Published: January 7, 2017 04:13 PM2017-01-07T16:13:09+5:302017-01-07T16:30:14+5:30
पार्थला मेंदूच्या या दुर्मिळ विकारातून बरे करण्यासाठी त्याच्या वडिलांनी सर्व बचत खर्च केली, संपत्ती आणि पत्नीचे दागिने विकले.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 7 - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या मदतीमुळे गुजरातच्या अमरेली जिल्ह्यातील 12 वर्षाच्या पार्थला नवीन आयुष्य मिळू शकते. मेंदूच्या दुर्मिळ विकाराने आजारी असलेल्या पार्थच्या उपचाराची सर्व जबाबदारी पंतप्रधान कार्यालयाने स्वीकारली आहे. उपचाराचा खर्च परवडत नसल्याने पार्थच्या आई-वडिलांनी अपेक्षा सोडून दिल्या होत्या.
पार्थला मेंदूच्या या दुर्मिळ विकारातून बरे करण्यासाठी त्याच्या वडिलांनी सर्व बचत खर्च केली, संपत्ती आणि पत्नीचे दागिने विकले. पण ऐवढे करुनही पार्थच्या प्रकृतीत काहीही फरक पडला नाही. अखेर उपचाराचा खर्च परवडणारा नसल्याने त्यांनी अपेक्षा सोडून दिली होती. शेवटचा प्रयत्न म्हणून त्यांनी पंतप्रधान कार्यालयाला पत्र लिहीले.
तिथूनही त्यांना फार अपेक्षा नव्हती. अचानक एक दिवस त्यांना पंतप्रधान कार्यालयाकडून सकारात्मक प्रतिसाद देणारे पत्र आले. दिल्लीच्या एम्स रुग्णालयात मुलावर मोफत उपचार करण्यात येतील असे त्या पत्रात लिहीले होते. पार्थची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर एम्स रुग्णालयात स्पेशलिस्ट डॉक्टरांकडून उपचार सुरु आहेत. पंतप्रधानांनी आम्हाला आर्थिक मदतच नाही तर, नैतिक पाठबळही दिले असे पार्थच्या वडिलांनी सांगितले.