जिवाची बाजी लावत 'त्या' 12 वर्षांच्या मुलानं रुग्णवाहिकेला दाखवला रस्ता, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2019 08:39 PM2019-08-15T20:39:46+5:302019-08-15T20:51:07+5:30

कर्नाटकात पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे.

12 year old felicitated for guiding ambulance across flooded bridge | जिवाची बाजी लावत 'त्या' 12 वर्षांच्या मुलानं रुग्णवाहिकेला दाखवला रस्ता, व्हिडीओ व्हायरल

जिवाची बाजी लावत 'त्या' 12 वर्षांच्या मुलानं रुग्णवाहिकेला दाखवला रस्ता, व्हिडीओ व्हायरल

googlenewsNext

बंगळुरूः कर्नाटकात पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. मुसळधार पावसानं कर्नाटकातील अनेक भाग पाण्याखाली गेले आहेत. एवढ्या मुसळधार पावसात 12 वर्षांच्या मुलानं माणुसकीचं अनोखं उदाहरण समोर ठेवलं आहे. रस्ता पाण्याखाली गेला असतानाही या 12 वर्षांच्या मुलानं अँब्युलन्सला अचूक मार्ग दाखवला आणि इच्छितस्थळी पोहोचवलं. त्यामुळे हा मुलगा आता सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. रायचूर जिल्ह्यातील रिरेरायनकुंपी गावात राहणाऱ्या या 12 वर्षांच्या मुलानं रुग्णवाहिकेला रस्ता दाखवताना आजूबाजूनं येणाऱ्या पाण्याच्या वेगाची पर्वाही केली नाही. तो पाण्याखाली गेलेल्या रस्त्यातूनही रुग्णवाहिकेला मार्ग दाखवत राहिला आणि त्यानं इतर चिमुकल्यांचे जीव वाचवले. रिपोर्ट्सनुसार, त्या वेळी अँब्युलन्समध्ये सहा मुलांसमवेत एका महिलेचा मृतदेह होता. 12 वर्षांच्या व्यंकटेशनं दाखवलेल्या शौर्याबद्दल 73व्या स्वातंत्र्याच्या दिवशीच त्याला सन्मानित करण्यात आलं. 

या मुलाची ओळख व्यंकटेशच्या रूपात झाली आहे. व्यंकटेशनं एका अँब्युलन्सला अशा वेळी रस्ता दाखवला होता, जेव्हा त्या अँब्युलन्सला पाण्याखाली गेलेला पूल पार करायचा होता. पुरामुळे तो पूल पूर्णतः पाण्याखाली गेला होता. अँब्युलन्सच्या चालकाला पुलावरच्या पाण्याचा अंदाज घेणं कठीण होतं. त्याचदरम्यान व्यंकटेश जवळपासच खेळत होता. अँब्युलन्स पुलावरच्या पाण्यामुळे अडकून पडल्याचं पाहताच लागलीच तो मदतीला धावून आला. हा सर्व प्रकार एका प्रत्यक्षदर्शीनं कॅमेऱ्यात कैद केला. व्यंकटेश कशा प्रकारे अँब्युलन्सला रस्ता दाखवत आहे हे व्हिडीओतून स्पष्टपणे दिसतं आहे. चीनमधल्या सीजीटीएन या चॅनेलनं हा व्हिडीओ दाखवला आहे. रस्ता दाखवताना त्या पुराच्या पाण्यात व्यंकटेश स्वतः अडखळला, पण धीरगंभीरपणे त्यानं अँब्युलन्सला रस्ता दाखवला. अँब्युलन्सला रस्ता दाखवत असताना गावकऱ्यांनीही त्याला प्रोत्साहन दिलं. व्यंकटेशनंही सुखरूपपणे अँब्युलन्सला मार्ग दाखवला आणि अँब्युलन्स तो पूल पार केल्यानंतर रुग्णालयात पोहोचली. कर्नाटकात आतापर्यंत पुरात 60 जणांनी जीव गमावला आहे. कर्नाटकातल्या 22 जिल्ह्यांतील 7 लाख लोक पुरानं प्रभावित आहेत. राज्य सरकारनं पीडितांसाठी 1 हजारांहून अधिक शिबिरं तयार केली आहेत.  

Web Title: 12 year old felicitated for guiding ambulance across flooded bridge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.