धक्कादायक! स्मोक पान खाल्ल्याने मुलीच्या पोटात पडलं छिद्र; शस्रक्रियेदरम्यान कापावा लागला भाग
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2024 04:23 PM2024-05-21T16:23:04+5:302024-05-21T16:29:15+5:30
बंगळुरुमध्ये स्मोक पान खाल्ल्यामुळे एका लहान मुलीच्या पोटात छिद्र पडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Smoke Paan Side-Effect: सध्याच्या लग्नसोहळ्यांमध्ये ट्रेडिंग गोष्टींचा मोठ्या प्रमाणात समावेश केला जात असल्याचे पाहायला मिळत आहे. मग लग्नातल्या जेवणातही याचा अधिक वापर होत आहे. लग्नातल्या जेवणावरुन अनेकदा चर्चा केली जात असते. त्यामुळे ते अधिक आकर्षक करण्याचा लोकांचा प्रयत्न असतो. मात्र याच नादात एका लहानग्या मुलीचा जीव जाता जाता वाचला आहे. एका लग्नात स्मोक पान खाल्ल्याने १२ वर्षीय मुलीच्या पोटात छिद्र पडण्याची गंभीर घटना घडली आहे.
बंगळुरुतील एका लग्नात हा सगळा धक्कादायक प्रकार घडला. मुलीचा त्रास वाढल्यानंतर तिच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली आणि शस्त्रक्रियेदरम्यान डॉक्टरांना तिच्या पोटाचा मोठा भाग कापावा लागला. बंगळुरुच्या एचएसआर लेआउट येथे लग्नाच्या रिसेप्शनमध्ये पीडित मुलीने स्मोक पान खाल्लं होतं. या प्रकारच्या पानामध्ये द्रव स्वरुपातल्या नायट्रोजनचा वापर केला जातो. पान खाल्ल्यानंतर अचानक मुलीच्या पोटात दुखू लागले. काही वेळातच मुलगी वेदनेने ओरडू लागली. मुलीची अवस्था पाहून कुटुंबियांनी तात्काळ तिला नारायण मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल दाखल केलं. इंट्राऑपरेटिव्हद्वारे डॉक्टरांना मुलीच्या पोटात द्रव नायट्रोजन जास्त प्रमाणात असल्याने छिद्र झाल्याचे कळलं.
मुलीची प्रकृती बिघडत चालल्याने नारायण मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी तिच्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. मुलीवरील शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली असून सध्या ती सुखरुप आहे. डॉक्टरांना शस्त्रक्रियेदरम्यान द्रव नायट्रोजनमुळे मुलीच्या पोटात ४.५ सेमीचे मोठे छिद्र तयार झाल्याचे आढळले. त्यामुळे डॉक्टरांना पोटाचा काही भाग कापावा लागला. या घटनेची चर्चा सध्या संपूर्ण बंगळुरु शहरात सुरु आहे.
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, द्रव स्वरुपातील नायट्रोजन पोटात गेल्यामुळे शरीराचे मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. नायट्रोजन पोटात गेल्यास त्याचे गंभीर परिणाम दिसू लागतात. दुसरीकडे या प्रकारच्या नायट्रोजनचा वापर लग्नाच्या पार्टीत दिल्या जाणाऱ्या अनेक प्रकारच्या पदार्थांमध्ये केला जात आहे.