१२० राजदूतांना मोदींनी केले संबोधित
By admin | Published: May 7, 2017 01:17 AM2017-05-07T01:17:05+5:302017-05-07T01:17:05+5:30
जगभरातील १२० देशांमधील भारतीय वकिलाती व उच्चायोगांच्या प्रमुखांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : जगभरातील १२० देशांमधील भारतीय वकिलाती व उच्चायोगांच्या प्रमुखांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित केले. या भाषणात मोदींनी जगातील बड्या शक्तींबरोबरच पाकिस्तान व चीनशी संबंधित तणावाचाही उल्लेख केला.
परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी पंतप्रधान संबोधित करतानाची छायाचित्रे टिष्ट्वटरवर शेअर केली आहेत. त्यात म्हटले आहे की, मोदींनी दिल्लीत मिशनप्रमुखांच्या आठव्या संमेलनाला संबोधित केले.
शुक्रवारपासून सुरू झालेल्या या चारदिवसीय संमेलनाचे औपचारिक उद्घाटन विदेशमंत्री सुषमा स्वराज यांनी केले होते.
जागतिक स्तरावर होत असलेल्या मोठ्या बदलांबाबत या संमेलनात चर्चा होण्याची शक्यता आहे. याबरोबरच या बदलांबाबत भारताने कोणती भूमिका घ्यावी, याचीही चर्चा होणार आहे.
यामध्ये राजदूतांनी ते ज्या देशांमध्ये नियुक्त केलेले आहेत, त्या देशांशी भारताचे असलेले द्विपक्षीय संबंध, यावर सादरीकरण केले. ट्रम्प प्रशासन व रशियाशी असलेले भारताचे संबंध, याबाबतही या संमेलनात चर्चा होण्याची शक्यता आहे. (वृत्तसंस्था)
पाकिस्तानी सैनिकांनी भारताच्या दोन सैनिकांची नृशंस हत्या केल्यानंतर दोन्ही देशांचे संबंध तणावपूर्ण बनलेले असतानाच्या काळात ही वार्षिक बैठक होत आहे. हा मुद्दाही चर्चेत येण्याची शक्यता आहे. विविध संसाधनांनी संपन्न असलेले आफ्रिकी महाद्वीप व खाडी देशांसमवेत भारताचे संबंध व पश्चिम आशियाच्या स्थितीबाबतही चर्चेची शक्यता आहे.