तेलंगणात १२0 कोटी जप्त; मतदारांना वाटण्यासाठी आला होता बेहिशेबी पैसा?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2018 06:44 AM2018-12-07T06:44:22+5:302018-12-07T06:44:32+5:30
मतदानाला २४ तास शिल्लक असताना गुरुवारी सकाळी तेलंगणात पोलीस व निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी मिळून तीन कोटी रुपये जप्त केले.
हैदराबाद : मतदानाला २४ तास शिल्लक असताना गुरुवारी सकाळी तेलंगणात पोलीस व निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी मिळून तीन कोटी रुपये जप्त केले. या प्रकरणात आठ जणांना पोलिसांनी अटक केली. ही रक्कम कर्नाटकातून आली होती, अशी प्राथमिक आहे. पण ती कोणी व कोणासाठी पाठवली हे स्पष्ट झालेले नाही.
सराफ व हिरे व्यापारी यांची ही रक्कम असल्याचा अंदाज आहे. पण हे खरे नाही. सराफ व हिरे व्यापारी इतके चाणाक्ष असतात की निवडणुकांच्या काळात आपल्याकडील काळाच काय, पण पांढरा पैसाही रोखीच्या स्वरूपात कुठे पाठवत नाहीत. त्यामुळे ही रक्कम मतदारांना वाटण्यासाठीच आली असणार, हे उघड आहे. ही एवढीच रक्कम नाही. आतापर्यंत तेलंगणात १२0 कोटी रुपये या पद्धतीने जप्त करण्यात आले. विधानसभेच्या ११९ मतदारसंघांत जप्त करण्यात आलेली रक्कम आहे १२0 कोटी रुपये. म्हणजे प्रत्येक मतदारसंघासाठी १ कोटींहून अधिक काळा पैसा आला आहे. पण ही जप्त करण्यात आलेली रक्कम आहे. जी रक्कम पकडली गेली नाही, ती याहून अधिक असावी, असा अंदाज आहे.
विधानभा निवडणुकांच्या काळातच ही रक्कम आली, याचाच अर्थ ती मतदारांना थेट वाटण्यासाठी वा निवडणुकांवर खर्च करण्यासाठी होती, हे उघड आहे. निवडणूक अधिकाºयांच्या म्हणण्यानुसार मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी सप्टेंबरमध्ये विधानसभा बरखास्त करण्याचा निर्णय घेतल्यानंतर लगेचच आपले १0५ उमेदवार जाहीर केले. त्यामुळे त्यांना प्रचारासाठी अधिक वेळ मिळाला आणि त्यामुळे काळा पैसाही या काळात अधिक आला.
मात्र राव यांच्या तेलंगणा राष्ट्र समितीसाठी हा पैसा आला का, याचे उत्तर मात्र कोणीच द्यायला तयार नाही.
>मध्यप्रदेशात २९ कोटी,
राजस्थानात ३५ कोटी
मध्य प्रदेशातील मतदान
आधीच झाले आहे. तिथे २३0 विधानसभा मतदारसंघ आहेत. निवडणूक काळात मध्यप्रदेशात २९ कोटी रुपयांची बेहिशेबी रक्कम जप्त करण्यात आली होती, तर राजस्थानात उद्या, शुक्रवारी मतदान व्हायचे आहे. तिथे आतापर्यंत ३५ कोटी रुपये पकडण्यात आले आहेत.
>नोटाबंदीचा हेतू साध्य झाला नाही
नोटाबंदी जाहीर करताना मोदी यांनी काळ्या पैशाला आळा घालणे हाही एक हेतू असल्याचे जाहीर केले होते. पण तसे घडले नाही. नोटाबंदीमुळे निवडणुकांतील काळा पैसा कमी झाला नाही, असे निवृत्त निवडणूक आयुक्त ओ. पी. रावत यांनी तीनच दिवसांपूर्वी सांगितले. त्यांचे म्हणणे खरे असल्याचे दिसते.
कोट्यवधींची दारूही पकडली गेली
केवळ पैशाचेच वाटप होत आहे, असे नसून, तेलंगणात उमेदवारांनी मतदारांना साड्या, शर्ट व पँटचे कापड, भांडी, धान्य याचेही वाटप केले आहे. दारू तर या काळात इतक्या मोठ्या प्रमाणात वाटली गेली की विचारता सोय नाही. मतांसाठी लोकांना दारू प्यायला लावणे, हे फारच झाले. पण निवडणूक जिंकण्यासाठी तेलंगणात सर्व मार्गांचा सर्व पक्ष आणि उमेदवारांनी अवलंब केला आहे. काही कोटींची दारूही तेलंगणातील बहुसंख्य मतदारसंघांत पकडली गेली आहे.