मुंबईकर आदित्यच्या ‘इंटेलिजन्स’ला गुगलने दिले १.२० कोटींचे पॅकेज
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2018 04:48 AM2018-07-09T04:48:44+5:302018-07-09T04:49:13+5:30
बंगळुरु येथील इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी (आयआयआयटी-बी) या संस्थेत शिकणाऱ्या व मूळ मुंबईचा रहिवासी असलेला आदित्य पालिवाल (२२ वर्षे) या कुशाग्र युवकाला गुगलने नोकरी देऊ केली
बंगळुरु - येथील इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी (आयआयआयटी-बी) या संस्थेत शिकणाऱ्या व मूळ मुंबईचा रहिवासी असलेला आदित्य पालिवाल (२२ वर्षे) या कुशाग्र युवकाला गुगलने नोकरी देऊ केली असून, त्याला वार्षिक १ कोटी २० लाख रुपये इतका पगार मिळणार आहे.
गुगलच्या न्यूयॉर्क येथील कृत्रिम प्रज्ञा (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स) संशोधन विभागात तो काम करणार असून, तेथे तो १६ जुलै रोजी रुजू होईल. आयआयआयटी-बीच्या रविवारी झालेल्या दीक्षान्त समारंभात आदित्यला पदवी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. कृत्रिम प्रज्ञा तंत्रज्ञानातील संशोधनासंदर्भात गुगलने जगभरात नुकतीच एक परीक्षा घेतली होती. त्यातील ६ हजार परीक्षार्थींमधून ५० जणांची अंतिम निवड करण्यात आली. त्यात आदित्यचा समावेश होता.
२०१७-१८ या कालावधीसाठी पार पडलेल्या एसीएम इंटरनॅशनल कॉलेजिएट प्रोग्रॅमिंग (आयसीपीसी) या स्पर्धेत आदित्य अंतिम फेरीत पोहोचला होता.
कॉम्प्युटर लँग्वेज कोडिंग या क्षेत्रात अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाºया या स्पर्धेत आदित्य पालिवाल, सिमरन डोजानिया व श्याम के. बी. यांचा संघ सहभागी झाला होता. या वर्षी या स्पर्धेत १११ देशांतील ३,९०८ विद्यापीठांतील ५० हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. बंगळुरू शहरात शिक्षणासाठी आदित्यने पाच वर्षे वास्तव्य केले होते.
गुगलने गेल्या मार्च महिन्यात माझी नोकरीसाठी निवड केली होती. इतकी मोठी संधी मिळाल्याने मला अतिशय आनंद झाला आहे. गुगलमध्ये मी नक्कीच उत्तम कामगिरी करून दाखवेन. - आदित्य पालिवाल