१२२ आजी-माजी खासदार, आमदारांविरोधात आर्थिक घोटाळ्याची प्रकरणे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2021 06:31 AM2021-08-11T06:31:52+5:302021-08-11T06:32:11+5:30
सर्वोच्च न्यायालयाने मागितली यादी
नवी दिल्ली : देशभरात तब्बल १२२ आजी-माजी आमदार आणि खासदारांविरोधात आर्थिक घोटाळ्याप्रकरणी गुन्हे दाखल असून त्या प्रकरणी तपास सुरू आहे. अंमलबजावणी संचालनालयाने ही माहिती सर्वोच्च न्यायालयात दिली. या नावांमध्ये सत्ताधारी भाजपसह विरोधी पक्षांमधील अनेक बड्या नेत्यांची नावे आहेत. विशेष म्हणजे काही आजी-माजी मुख्यमंत्र्यांसह अनेक राज्यांमधील मंत्र्यांचाही समावेश आहे. ही प्रकरणे अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत.
विद्यमान मुख्यमंत्र्यांमध्ये पंजाबचे कॅप्टन अमरिंदर सिंग आणि आंध्र प्रदेशचे वाय.एस जगन मोहन रेड्डी यांच्या नावांचा या यादीत समावेश आहे. तर भाजपचे बी.एस. येडीयुरप्पा, काँग्रेसचे अशोक चव्हाण, भूपेंद्र हुडा, स्व. वीरभद्रसिंग, दिगंबर कामत, ओकराम इबोबी सिंग, नबाम तुकी यांच्यासह नॅशनल कॉन्फरन्सचे फारूख अब्दुल्ला, जेडीएसचे गेगोंग अपांग, आयएनएलडीचे ओ.पी चौटाला व एनसीपीचे चर्चिल आलेमाओ या माजी मुख्यमंत्र्यांविरुद्धही आर्थिक घोटाळ्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. काही प्रमुख विद्यमान मंत्री आणि आमदारांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ, काँग्रेसचे डी.के. शिवकुमार, लालूप्रसाद यादव यांचे पुत्र तेजस्वी यादव, तृणमूल काँग्रेसचे मदन मित्रा, सुब्रता मुखर्जी, शोभन चॅटर्जी आणि श्यामपद मुखर्जी यांच्या नावांचा समावेश आहे. या यादीची सुरुवात ए.राजा, के. कनिमोळी यांच्यापासून होते. दोघांविरोधात २०१० मध्ये 2जी स्पेक्ट्रम घोटाळ्याप्रकरणी गुन्हे दाखल होते. मात्र, त्यांची निर्दोष मुक्तता झाली होती.