हिमाचलमधील १२३९ वाहतूक रस्ते ठप्प, पर्यटक अडकले; आतापर्यंत ४ हजार कोटींचे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2023 03:02 PM2023-07-11T15:02:34+5:302023-07-11T15:09:48+5:30
हिमाचलमध्ये सलग तीन दिवस मुसळधार पावसाने कहर केला आहे.
मुसळधार पाऊस आणि पुरामुळे उत्तर भारतातील सात राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला आहे. हिमाचल, पंजाब, जम्मू आणि काश्मीर, उत्तराखंड, हरियाणा, राजस्थान आणि दिल्लीमध्ये सर्व प्रमुख नद्यांचा प्रवाह आहे. डोंगर कोसळत असून रस्ते वाहून जात आहेत. सोमवारी गेल्या २४ तासांत विविध राज्यांमध्ये ४४ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. हिमाचलमध्ये २० जणांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे, उत्तर प्रदेशात पावसाशी संबंधित घटनांमध्ये आठ जणांचा मृत्यू झाला आहे.
हिमाचलमध्ये सलग तीन दिवस मुसळधार पावसाने कहर केला आहे. आतापर्यंत ५९ लोकांचा मृत्यू झाला असून ४ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. कुल्लू-मनाली, मंडी आणि राज्याच्या वरच्या भागात हजारो लोक अडकले आहेत. बहुतांश जिल्ह्यांमध्ये वीज, फोन आणि इंटरनेट सेवाही ठप्प झाल्या आहेत. १२३९ रस्ते सकाळी वाहतुकीसाठी बंद करण्यात आले होते. २५७७ वीज ट्रान्सफॉर्मरही रखडले आहेत. १४१८ पाणीपुरवठा योजनाही बंद पडून आहेत. त्यांच्या जीर्णोद्धारात संबंधित विभाग गुंतले आहेत. शिमल्यात सर्वाधिक ५८१, मंडीमध्ये २००, चंबामध्ये ११६, सिरमौरमध्ये १०१, हमीरपूर आणि लाहौल-स्पीतीमध्ये जवळपास ९७ रस्ते बंद आहेत.
24 घंटों में हम आगे बढ़ पाएंगे। मंडी में कुछ जगह पानी(पीने का पानी) की व्यवस्था दी जा रही है। 1300-1400 बसें रूट से निलंबित हैं। कुल्लू में स्थिति सबसे गंभीर बनी हुई है, कुल्लू में सभी रूट बंद हैं, राज्य सरकार की बसे सुरक्षित जगहों पर खड़ी हैं जिस कारण से बसों को किसी प्रकार की… pic.twitter.com/uieovyTBRg
— ANI_HindiNews (@AHindinews) July 11, 2023
हिमाचलमध्ये आतापर्यंत ४ हजार कोटींचे नुकसान झाले आहे. हिमाचलमध्ये सलग तीन दिवस मुसळधार पावसाने कहर केला आहे. आतापर्यंत ४ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. कुल्लू-मनाली, मंडी आणि राज्याच्या वरच्या भागात हजारो लोक अडकले आहेत. बहुतांश जिल्ह्यांमध्ये वीज, फोन आणि इंटरनेट सेवाही ठप्प झाल्या आहेत. कुल्लूमध्ये ढगफुटीमुळे १०० बिघा जमीन नाल्यात वाहून गेली.
पंजाबमधील ५० गावे रिकामी, लष्कर तैनात
पंजाबमधील पूरस्थितीमुळे पाच जिल्ह्यातील ५० गावे रिकामी करण्यात आली आहेत. लोकांना गुरुद्वारांमध्ये ठेवण्यात आले आहे. जालंधरमधील फिल्लौर पोलीस अकादमीत सतलज नदीचे पाणी शिरले आहे. चंदीगडमध्ये तीन दिवसांत ४५० मिमी पाऊस झाला. मोहाली आणि पटियाला येथे लष्कर तैनात करण्यात आले आहे. फतेहगढ साहिबच्या महाविद्यालयात पाणी साचल्याने अनेक विद्यार्थी अडकले असून त्यांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. एनडीआरएफचे पथक मदतकार्यात गुंतले आहेत. १७ गाड्या रद्द करण्यात आल्या. दिल्ली-चंदीगड राष्ट्रीय महामार्ग-१ बंद करण्यात आला आहे.
राजधानी दिल्लीत पुराचा धोका
राष्ट्रीय राजधानीत यमुनेच्या पाण्याने २०५.८८ मीटरचा धोक्याचा टप्पा ओलांडला आहे. यमुनेच्या काठावरील भागातून लोकांना बाहेर काढले जात आहे. मंगळवारपर्यंत पाण्याची पातळी २०६.६५ मीटरच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अधिकाऱ्यांना आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मुसळधार पावसामुळे दिल्लीतील प्राथमिक शाळा मंगळवारी बंद राहणार आहेत. याशिवाय एमसीडीच्या सर्व शाळाही बंद राहतील.