१२६ राफेल लढाऊ विमानांची गरज नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2015 01:57 AM2015-06-01T01:57:08+5:302015-06-01T01:57:08+5:30
संपुआ सरकारच्या काळात झालेला १२६ राफेल लढाऊ विमाने खरेदीचा प्रस्तावित सौदा ‘आर्थिकदृष्ट्या अवास्तव, न परवडणारा आहे
नवी दिल्ली : संपुआ सरकारच्या काळात झालेला १२६ राफेल लढाऊ विमाने खरेदीचा प्रस्तावित सौदा ‘आर्थिकदृष्ट्या अवास्तव, न परवडणारा आहे आणि अनावश्यक आहे. भारताला एवढ्या विमानांची गरज नाही. रालोआ सरकार फ्रान्सकडून १२६ नव्हे, तर केवळ ३६ राफेल लढाऊ विमानांचीच खरेदी करील आणि या विमानांचा वापर सामरिक उद्देशासाठी केला जाईल, असे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी रविवारी स्पष्ट केले.
माजी संरक्षणमंत्री ए.के. अॅन्टोनी यांनी सुरू केलेल्या राफेलच्या निविदा प्रक्रियेवरही पर्रीकर यांनी प्रश्नचिन्ह लावले. राफेल विमान सौदा कधीही लागू होऊ नये या दृष्टीने अॅन्टोनी यांनी या निविदा प्रक्रियेत बाधा निर्माण करून ठेवलेल्या आहेत, असा स्पष्ट आरोप पर्रीकर यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संरक्षण खरेदी परिषद या वित्त मंत्रालय आणि संरक्षण प्रकल्पांवर निर्णय घेणाऱ्या संरक्षण मंत्रालयाच्या संस्थेची अवहेलना केल्याचा काँग्रेसचा आरोप पर्रीकर यांनी फेटाळून लावला.
(लोकमत न्यूज नेटवर्क)