१२८ वर्षांच्या जोहाना आजी गेल्या, त्यांची गोष्ट!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2023 12:15 PM2023-03-24T12:15:59+5:302023-03-24T13:23:50+5:30

११ मे १८९४ रोजी त्यांचा जन्म झाल्याची अधिकृत नोंद आमच्याकडे आहे. त्यांच्या जन्माच्या या पुराव्याची दखल घेतली गेली असती तर त्या जगातल्या सर्वांत वयोवृद्ध महिला ठरल्या असता.

128-year-old Johanna's grandmother passed away, her story | १२८ वर्षांच्या जोहाना आजी गेल्या, त्यांची गोष्ट!

१२८ वर्षांच्या जोहाना आजी गेल्या, त्यांची गोष्ट!

googlenewsNext

जाेहाना माझीबुको. दक्षिण आफ्रिकेच्या या आजीबाई. वयाच्या १२८व्या वर्षी नुकतंच त्यांचं निधन झालं. आणखी दोन महिने त्या जगल्या असत्या तर त्यांनी वयाची १२९ वर्षे पूर्ण केली असती. जगातल्या या सर्वात वयोवृद्ध महिला मानल्या जातात. खरंतर अख्ख्या जगाच्याच त्या आजी; पण त्यांचं दुर्दैव असं की गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकाॅर्डमध्ये त्यांचं नाव नोंदलंच गेलं नाही. त्यांच्या जवळचे लोक म्हणतात, त्यांच्या जन्माचा पुरावा आमच्याकडे आहे. ११ मे १८९४ रोजी त्यांचा जन्म झाल्याची अधिकृत नोंद आमच्याकडे आहे. त्यांच्या जन्माच्या या पुराव्याची दखल घेतली गेली असती तर त्या जगातल्या सर्वांत वयोवृद्ध महिला ठरल्या असता.

आयुष्यभर त्यांनी काबाडकष्ट केले, गरिबीत दिवस काढले; पण आयुष्याच्या अखेरीस तरी त्यांना गिनिज बुकचा सन्मान मिळाला असता, पण तसं झालं नाही. अर्थातच जोहाना आजींना त्यासंदर्भात कधीच काही वाटलं नाही; पण त्यांच्या १२८व्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांची जी मुलाखत घेण्यात आली, त्यावेळी त्यांनी जे विचार व्यक्त केले होते, त्यासंदर्भातली चर्चा मात्र आता नव्यानं सुरू झाली आहे. 
त्यांचं जगणं, त्यांचं वागणं, त्यांचं राहणीमान, इतके उन्हाळे-पावसाळे त्यांनी पाहिले, जगातल्या सर्वात वयोवृद्ध महिला त्या ठरल्या, याबद्दल खुद्द जोहाना आजींचं मत काय होतं, याबद्दल केवळ सोशल मीडियाच नव्हे, जाणकार लोकांमध्येही गांभीर्यानं चर्चाविमर्श होऊ लागले आहेत.

जोहाना आजी या मुलाखतीत म्हणाल्या होत्या.. मी इतकी वर्षे का जगले, कशी जगले, याविषयी माझं मलाच अतिशय कुतूहल वाटतं आहे; पण त्याहीपेक्षा मी अजून का जिवंत आहे, याचंही वैषम्य मला वाटतंय. माझ्या आजूबाजूचे लोक एकामागून एक जग सोडून जाताहेत, मग मलाच का एवढं सोनं लागलं आहे? मी का अजून या भूमीशी चिटकून आहे? गेली काही वर्षे मी फार काही न करता जवळपास एकाच जागी बसले आहे. अशा पद्धतीनं जगून काय उपयोग? माझं नुसतंच वय वाढत चाललंय; पण माझा, माझ्या जगण्याचा समाजाला काही उपयोग होतोय का? मग मी का म्हणून जगावं? तुमच्या जगण्याला जर काही अर्थच नसेल, तर तुम्ही किती वर्षे जगलात, अगदी जगातल्या सर्वात वयोवृद्ध व्यक्ती झालात, याला तरी काय अर्थ आहे? माझ्या या अस्तित्वाला कदाचित जगही कंटाळलं असेल...
त्यांच्या या उत्तरानं केवळ मुलाखतकर्ताच नव्हे, तर ही मुलाखत प्रसिद्ध झाल्यानंतर अनेकांना जोहाना आजींच्या विचारांचं कौतुक वाटलं. त्यांच्या विचारांचं सार काढायचं तर, तुम्ही वृद्ध असा किंवा तरुण, तुम्ही काय करता, तुमच्या असण्याचा, अस्तित्वाचा समाजाला काय उपयोग आहे, ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची. त्यामुळे तुमचं जगणं अर्थपूर्ण असलं पाहिजे, हाच त्याचा मतितार्थ.

या जोहाना आजी सुरुवातीपासूनच निरक्षर. त्यांना लिहिता, वाचता येत नव्हतं. ज्यांनी तब्बल तीन शतकं पाहिली, अशा बोटावर मोजण्याइतक्या माणसांत जोहाना आजींचा नंबर लागतो. त्यांनी एकोणिसावं शतक पाहिलं, विसाव्या शतकातल्या अनेक ऐतिहासिक घडामोडी त्यांच्यात काळात घडल्या आणि एकविसाव्या शतकाच्या पाव हिश्शाच्याही त्या साक्षीदार होत्या!.. १९१४मध्ये झालेलं पहिलं महायुद्ध त्यांच्याच काळात झालं, १९३९मध्ये झालेल्या दुसऱ्या महायुद्धाची झळ त्यांनाही सोसावी लागली. स्पॅनिश फ्लूपासून ते कोरोना महामारीपर्यंत जी जागतिक संकटं मानवावर ओढवली, त्याच्याही त्या केवळ साक्षीदारच नव्हत्या, तर त्यातूनही त्या तावून सुलाखून बाहेर पडल्या.

जोहाना आजींच्या कुटुंबातील जवळपास सगळ्यांनाच दीर्घायुष्याचं वरदान लाभलं असावं. जोहाना आजींना त्यांच्यासह एकूण बारा भावंडं. त्यातील तीन अजूनही जिवंत आहेत. आपल्यापेक्षा वयानं बऱ्याच मोठ्या असलेल्या पतीशी जोहाना यांचा विवाह झाला होता. त्यांच्या पतीची पहिली पत्नी वारल्यानंतर त्यांनी जोहाना यांच्याशी दुसरा विवाह केला होता. त्यांना सात मुलं झाली. त्यातील पाच दगावली; पण दोन अजूनही हयात आहेत. त्यांना पन्नासपेक्षाही जास्त, नातू, पणतू, खापरपणतू आहेत. जगाची ही आजी गेली; पण जातानाही आपल्या विचारांची मौल्यवान पुरचंडी ती सगळ्यांसाठी ठेवून गेली..

मी कष्ट केले, निसर्गानं दीर्घायुष्य दिलं!
जोहाना आजी सांगायच्या, जगाकडून, कुटुंबाकडून, अगदी कोणाकडूनही माझ्या कधीच, काही अपेक्षा नव्हत्या. कष्ट करत राहणं, संघर्ष करत राहणं एवढंच फक्त मला माहीत होतं. त्या कष्टाचा मी कधी बाऊ केला नाही किंवा वेळोवेळी आलेल्या संकटांनी मी कधी खचून गेले नाही. त्याची परतफेड म्हणूनच कदाचित निसर्गानं माझ्या ओंजळीत दीर्घायुष्याचं दान टाकलं असावं; पण माझ्या लायकीपेक्षा ते खूपच जास्त होतं..

Web Title: 128-year-old Johanna's grandmother passed away, her story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.