नववी, दहावी आणि ११वीच्या गुणांवर लागणार बारावीचा निकाल?; महाराष्ट्रासह इतरांनी सुचवला 'हा' पर्याय

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2024 11:46 AM2024-07-31T11:46:49+5:302024-07-31T12:23:06+5:30

Class 12 Report Card : केंद्रीय शिक्षण मंत्रालय बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्याची शक्यता आहे.

12th result will be prepared from 9th to 11th marks new formula in NCERT Key Report | नववी, दहावी आणि ११वीच्या गुणांवर लागणार बारावीचा निकाल?; महाराष्ट्रासह इतरांनी सुचवला 'हा' पर्याय

नववी, दहावी आणि ११वीच्या गुणांवर लागणार बारावीचा निकाल?; महाराष्ट्रासह इतरांनी सुचवला 'हा' पर्याय

NCERT Parakh Report : येत्या काळात बारावीच्या निकालात नववी, दहावी आणि अकरावीचे गुण महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. पारख नावाच्या राष्ट्रीय मूल्यांकन नियामकाने नुकत्याच शिक्षण मंत्रालयाला यासंदर्भात एक अहवाल सादर केला आहे. अहवालानुसार इयत्ता नववी ते अकरावी पर्यंतच्या  विद्यार्थ्याने मिळवलेले गुण हे इयत्ता बारावीच्या त्याच्या अंतिम निकालाशी जोडले जावेत. अहवाल सादर करण्यापूर्वी पारखने गेल्या वर्षी ३२ शाळांशी या विषयावर सखोल चर्चा केली आहे.

इयत्ता नववी, दहावी आणि अकरावीमधील विद्यार्थ्यांची कामगिरी आणि परीक्षा या दोन्हींवर आधारित गुण इयत्ता बारावीच्या शेवटी विद्यार्थ्यांना देण्यात यावेत, असे पारखने शिक्षण मंत्रालयाला सादर केलेल्या अहवालात म्हटलं आहे. देशभरातील शाळा मंडळांद्वारे याचे मूल्यांकन करण्यासाठी एनसीआरटीने गेल्या वर्षी पारखची स्थापन करण्यात आली होती.  अहवालात नववी ते अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या कामगिरीच्या आधारे बारावीचा निकाल तयार करण्यात यावा, असे म्हटले आहे. या तीन वर्गातील विद्यार्थ्यांनी परीक्षेत चांगली कामगिरी केली आणि सतत वर्गात राहिल्यास त्याचा फायदा त्यांना बारावीच्या निकालात मिळायला हवा, असे अहवालात म्हटले आहे. 

पारखच्या अहवालात इयत्ता बारावीच्या निकालात इयत्ता नववीला १५ टक्के, दहावीला २० टक्के आणि अकरावीला २५ टक्के वेटेज देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. याशिवाय बारावीच्या रिझल्टमध्ये एकत्रित मूल्यमापन, फॉर्मेटिव्ह असेसमेंट (संपूर्ण प्रगतीपुस्तक, प्रकल्प) आणि सहामाही परीक्षा यांनाही महत्त्व दिले जाईल, असेही अहवालात म्हटलं आहे.

इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, शिक्षण मंत्रालय हा अहवाल सर्व राज्य शाळा मंडळांना पाठवणार आहे. जेणेकरुन सर्वांनी यावर आपले मत मांडावे आणि सर्वांनी सहमती दर्शवल्यास हा अहवाल लवकरच लागू करता येईल. गेल्या वर्षभरात या शिफारशीवर ३२ शाळा मंडळांशी चर्चा करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. दरम्यान, गेल्या आठवड्यात हरियाणा, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि बिहारच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चेची पहिली फेरी झाली होती.

या बैठकीमध्ये, राज्यांनी वेगवेगळे युक्तिवाद केले. इयत्ता नववी, दहावी आणि अकरावीची कामगिरी बारावीच्या रिझल्टमध्ये एकत्रित करण्याऐवजी, नववीमधील ४० टक्के आणि दहावीमधील ६० टक्के वेटेज यांच्यावर दहावीचा निकाल दिला पाहिजे. तसेच अकरावीमधील ४० टक्के, बारावीतील ६० टक्के वेटेजवर बारावीचा निकाल द्यायला हवा, असे राज्यांनी सुचवलं आहे.

Web Title: 12th result will be prepared from 9th to 11th marks new formula in NCERT Key Report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.