अपघातग्रस्त हेलिकॉप्टरमधील १४ पैकी १३ जणांचा मृत्यू; मृतदेहांची डीएनए चाचणी होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2021 05:07 PM2021-12-08T17:07:26+5:302021-12-08T17:08:05+5:30
तमिळनाडूच्या कुन्नूरमध्ये हेलिकॉप्टरला अपघात; सीडीएस रावत यांना घेऊन जात होतं चॉपर
मुंबई: लष्कराच्या हेलिकॉप्टरला तमिळनाडूमध्ये अपघात झाला आहे. कोईम्बतूर आणि सुलूर दरम्यान MI-17V5 हेलिकॉप्टर कोसळलं. या हेलिकॉप्टरमधून चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत प्रवास करत होते. हेलिकॉप्टर जंगल परिसरात कोसळलं. त्यानंतर हेलिकॉप्टरनं पेट घेतला. या घटनेच्या चौकशीचे आदेश लष्कराकडून देण्यात आले आहेत.
हेलिकॉप्टरमधून एकूण १४ जण प्रवास करत होते. यापैकी १३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती एएनआय वृत्तसंस्थेनं सुत्रांच्या हवाल्यानं दिली आहे. डीएनए चाचणीच्या मदतीनं १३ मृतदेहांची ओळख पटवली जाणार असल्याचं वृत्त एएनआयनं दिलं आहे.
13 of the 14 personnel involved in the military chopper crash in Tamil Nadu have been confirmed dead. Identities of the bodies to be confirmed through DNA testing: Sources
— ANI (@ANI) December 8, 2021
सीडीएस बिपिन रावत यांच्यासह त्यांच्या पत्नी आणि लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर दुपारी पाऊणच्या सुमारास तमिळनाडूच्या कुन्नूरमध्ये कोसळलं. ग्रुप कॅप्टन पी. एस. चौहान आणि स्क्वॉड्रन लीडर कुलदीप यांच्याकडे चॉपरचं सारथ्य होतं.
चॉपरमध्ये कोण कोण होतं?
बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका यांच्यासोबत लष्कराचे वरिष्ठ अधिकारी होते. ब्रिगेडियर एल. एस. लिड्डर, लेफ्टनंट कर्नल हरजिंदर सिंग, नायक गुरुसेवक सिंग, नायक जितेंद्र कुमार, लान्स नायक विवेक कुमार, लान्स नायक साई तेजा आणि हवालदार सत्पाल अपघातावेळी हेलिकॉप्टरमध्ये होते.
लष्कर वापरत असलेलं MI-17V5 हेलिकॉप्टर अतिशय सुरक्षित मानलं जातं. रशियन बनावटीच्या या चॉपरमध्ये दोन इंजिन असतात. व्हिआयपींच्या प्रवासासाठी या विमानाचा वापर केला जातो. व्हिआयपी या चॉपरमधून उड्डाण करण्यापूर्वी अनेक प्रोटोकॉल्स पूर्ण केली जातात. विमानाची देखभाल, हवामान यांची अनेकदा पडताळणी केली जाते.