Fishermen Missing : गुजरातमधील गीर सोमनाथ समुद्रात मोठा अपघात, वादळामुळे 15 बोटी बुडाल्या; अनेक जण बेपत्ता
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2021 11:31 AM2021-12-02T11:31:27+5:302021-12-02T11:33:52+5:30
महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारी भागात कालपासूनच सतत्याने पाऊस सुरू आहे आणि IMD नुसार येत्या 48 तासांत येथे मुसळधार पाऊस पडू शकतो.
गुजरातमधील गिर सोमनाथ येथे गेल्या रात्री सातत्याने सुरू असलेला पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे 13 ते 15 बोटी समुद्रात बुडाल्याची शक्यता आहे. या बोटीत काही मच्छीमारही होते. मिळालेल्या माहितीनुसार, बोटीवरील 8 ते 10 मच्छीमार अद्यापही बेपत्ता आहेत. कालपासूनच बिघडलेले हवामान पाहता, हवामान विभागाने मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा दिला होता.
महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारी भागात कालपासूनच सतत्याने पाऊस सुरू आहे आणि IMD नुसार येत्या 48 तासांत येथे मुसळधार पाऊस पडू शकतो. यासोबतच मच्छीमारांनाही 5 दिवसांचा इशारा देण्यात आला आहे. तसेच, ओडिशा आणि आंध्रला 'जवाद' या चक्रिवादळाचा धोकाही आहे. अहमदाबादेत IMD च्या क्षेत्रीय निदेशक मनोरमा मोहंती यांनी म्हटले होते, की गुजरातेत 30 नोव्हेंबरपासून पाऊस सुरू होईल. याच बरोबर 30 नोव्हेंबर ते 2 डिसेंबरपर्यंत मच्छीमारांना उत्तर आणि दक्षिण गुजरातच्या किनारी भागासाठीही इशारा देण्यात आला आहे.
या राज्यात होऊ शकतो पाऊस -
भारतीय हवामान खात्याच्या माहितीनुसार, 1 ते 2 डिसेंबरदरम्यान (कालपासून आजपर्यंत) पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि मध्य प्रदेशात तुरळक पाऊस होण्याची शक्यता आहे. तर, 2 डिसेंबर म्हणजेच आज उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि राजस्थानात गडगडाटासह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. याशिवाय अंदमान निकोबार बेटांवरही मुळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.