७ महिन्यांनी इंटरनेट सुरु झालं अन् मणिपूर पुन्हा एकदा पेटलं; हिंसाचारात १३ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2023 09:16 AM2023-12-05T09:16:54+5:302023-12-05T09:19:56+5:30

तेंगनौपाल जिल्ह्यातील लेथिथू गावाजवळ दोन गटांमध्ये गोळीबार झाला.

13 bodies recovered in Manipur after firing incident in Tengnoupal district | ७ महिन्यांनी इंटरनेट सुरु झालं अन् मणिपूर पुन्हा एकदा पेटलं; हिंसाचारात १३ जणांचा मृत्यू

७ महिन्यांनी इंटरनेट सुरु झालं अन् मणिपूर पुन्हा एकदा पेटलं; हिंसाचारात १३ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली: ईशान्येकडील मणिपूर राज्यात पुन्हा एकदा हिंसाचार उसळला आहे. राज्यातील तेंगनौपाल जिल्ह्यात सोमवारी दोन गटांमध्ये झालेल्या गोळीबारात १३ जणांचा मृत्यू झाला. इंटरनेटवरील बंदी हटल्यानंतर मणिूपर पुन्हा एकदा पेटले आहे.

एका अधिकाऱ्याने सांगितले की, तेंगनौपाल जिल्ह्यातील लेथिथू गावाजवळ दोन गटांमध्ये गोळीबार झाला. गोळीबाराची माहिती मिळताच आमचे सुरक्षा दल घटनास्थळी पोहोचले, तेथून आम्ही १३ मृतदेह बाहेर काढले. मृतदेहांजवळ कोणतीही शस्त्रे सापडली नाहीत.

मृत हे या ठिकाणचे स्थानिक रहिवासी नसल्याचे सांगितले जात आहे. मणिपूर राज्यात ७ महिन्यांनंतर रविवारी (३ डिसेंबर) मोबाइल इंटरनेट सेवेवरील बंदी उठवण्यात आली होती. त्याचाच दुसऱ्या दिवशी ही घटना घडली. तर काही जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागात अजूनही निर्बंध कायम आहेत.

मणिपूरमध्ये ७ महिन्यांपासून हिंसाचार-

ईशान्येकडील मणिपूरमध्ये हिंसाचार उसळला होता. येथील मैतेई आणि अन्य आदिवासी जमातींमधील गट परस्परांना भिडल्याने राज्यामध्ये हिंसाचाराचा अक्षरशः आगडोंब उसळला होता. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने लष्कर व आसाम रायफल्सच्या जवानांना पाचारण करण्यात आले आणि हिंसाचारावर नियंत्रण मिळवण्यात आले. मात्र, हिंसाचारामुळे अनेक लोकांवर विस्थापित होण्याची वेळ आली. तसेच, यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला. 

नऊ मैतेई संघटनांवर आणखी पाच वर्षे बंदी-

केंद्र सरकारने नऊ मैतेई बंडखोर संघटनांवरील बंदी सोमवारी आणखी पाच वर्षांसाठी वाढवली. या संघटनांच्या फुटीरवादी, घातपाती, दहशतवादी व हिंसक कारवायांना आळा घालण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलल्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाने याबाबत जारी केलेल्या एका अधिसूचनेत म्हटले आहे.

या आहेत त्या संघटना-

पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) व तिची राजकीय शाखा रिव्होल्युशनरी पीपल्स फ्रंट (आरपीएफ), द युनायटेड नॅशनल लिबरेशन फ्रंट (यूएनएलएफ) आणि तिची सशस्त्र शाखा मणिपूर पीपल्स आर्मी (एमपीए), पीपल्स रिव्होल्युशनरी पार्टी ऑफ कांगलीपाक आणि तिची सशस्त्र शाखा, ‘रेड आर्मी’, कांगलीपाक कम्युनिस्ट पार्टी (केसीपी) आणि तिची सशस्त्र शाखा, तिलासुद्धा ‘रेड आर्मी’ म्हटले जाते, कांगलेई याओल कानबा लुप (केवायकेएल), समन्वय समिती (सीओआरसीओएम) व अलायन्स फॉर सोशलिस्ट युनिटी कांगलीपाक (एएसयूके) आणि या संघटनांचे सर्व गट, शाखा आणि आघाड्या. 

Web Title: 13 bodies recovered in Manipur after firing incident in Tengnoupal district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.