१३ तासांचा विलंब, प्रवाशांची रात्र विमानातच
By admin | Published: March 23, 2016 03:33 AM2016-03-23T03:33:09+5:302016-03-23T03:33:09+5:30
तांत्रिक बिघाड झाल्यामुळे एअर इंडियाच्या बोर्इंग ७८७ या विमानाच्या उड्डाणास तब्बल १३ तासांचा विलंब लागला. परिणामी दिल्लीला जाणाऱ्या १५० प्रवाशांना अख्खी रात्र विमानातच घालवावी लागली.
कोलकाता : तांत्रिक बिघाड झाल्यामुळे एअर इंडियाच्या बोर्इंग ७८७ या विमानाच्या उड्डाणास तब्बल १३ तासांचा विलंब लागला. परिणामी दिल्लीला जाणाऱ्या १५० प्रवाशांना अख्खी रात्र विमानातच घालवावी लागली. कोलकाता विमानतळावर रविवारी रात्री ही घटना घडली.
एअर इंडियाचे फ्लाईट एआय ७०१ हे विमान २३६ प्रवाशांना घेऊन कोलकाता विमानतळावरून रविवारी सायंकाळी ५.३० वाजता दिल्लीला उड्डाण करणार होते. विमान प्रवाशांमध्ये माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी, गायक शफाकत अमानत अली आणि भारतातील पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बासित यांचा समावेश होता. विमान दिल्लीला उड्डाण करण्याच्या तयारीत असतानाच त्यात तांत्रिक बिघाड झाल्याचे लक्षात आले. बिघाड दूर करण्यास वेळ लागेल, हे समजल्यानंतर बासित, येचुरी आणि अन्य २१ प्रवाशांना विमानातून खाली उतरविण्यात येऊन त्यांची दुसऱ्या विमानात दिल्लीला जाण्याची सोय करण्यात आली. अन्य प्रवाशांना मात्र विमानातच बसून राहण्यास सांगण्यात आले होते. विमानातील बिघाड दुरुस्त होणार नाही हे रात्री १० वाजता लक्षात आल्यानंतर प्रवाशांना दुसऱ्या विमानाने दिल्लीला पाठविण्याचे ठरले. त्यानंतर एअर इंडियाचे दुसरे विमान कोलकाता विमानतळावर उतरले आणि प्रवाशांना एआय ७०१ या विमानाने दिल्लीला रवाना करण्याचा निर्णय घेण्यात आला. सर्व प्रवासी बंद पडलेल्या विमानातून उतरून दुसऱ्या विमानात चढले. परंतु वैमानिकाची फ्लार्इंग ड्युटी संपल्याने हे विमानही सोमवारी सकाळी ६.३० वाजेपर्यंत उड्डाण करू शकले नाही, त्यामुळे प्रवाशांना विमानातच रात्र घालवावी लागली. (वृत्तसंस्था)