फेसबुकवरील प्रेमाच्या भानगडीत झाली 13 लाखांची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2018 03:02 PM2018-02-20T15:02:23+5:302018-02-20T16:32:29+5:30
सध्या सोशल मीडियावरून होणाऱ्या प्रेमप्रकरणांमधून फसवणूक होण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. एका सॉफ्टवेअर इंजिनिअरलाही फेसबूकवरील प्रेमप्रकरणामधून...
बंगळुरू - सध्या सोशल मीडियावरून होणाऱ्या प्रेमप्रकरणांमधून फसवणूक होण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. बंगळुरूमधील एका सॉफ्टवेअर इंजिनिअरलाही फेसबूकवरील प्रेमप्रकरणामधून अशाच प्रकारास सामोरे जावे लागले आहे. फेसबूकवर एका तरुणीशी ओळख झाल्यानंतर दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. मात्र काही दिवसांनंतर सदर तरुणीने आपल्या आईच्या उपचारासाठी 13 लाख रुपयांची मागणी केली. या इंजिनियरने तिला पैसेही दिले मात्र नंतर आपली फसवणूक झाल्याचे त्याच्या निदर्शनास आले.
याबाबत सविस्तक हकीकत अशी, गदग जिल्ह्यातील हुल्लुरू गावातील एका सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणाला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर तरुणाकडून आईच्या उपचारांसाठी पैसे उकळून त्याची 13 लाखांची फसवणूक केली. यासंदर्भात सदर तरुणाने पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. बंगळुरू येथे राहणाऱ्या राधा कुलकर्णी नामक महिलेने फेसबूकवर झालेल्या ओळखीनंतर आपली फसवणूक केल्याचा आरोप या तरुणाने केला आहे.
"राधा हिने श्वेता कुलकर्णी या नावाने फेसबूकवर अकाउंट बनवले होते. त्यानंतर तिने आपल्याला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. त्यानंतर आम्ही रोज ऑनलाइन चॅटिंग करू लागलो. काही दिवसांतच आपली तिच्याशी मैत्री झाली. मग या महिलेने आपणास प्रपोझ केले आणि लग्नाचा प्रस्ताव ठेवला. त्यामुळे माझा तिच्यावर विश्वास बसला, अशी माहिती पीडित तरुणाने दिली आहे. पुढे या महिलेने आपल्या आईच्या उपचारासाठी पीडित तरुणाकडे पैशाची मागणी केली. त्यानंतर सदर तरुणाने डिसेंबर 2016 ते ऑगस्ट 2017 दरम्यान, तिच्या बँक खात्यात 13 लाख रुपये जमा केले. मात्र नंतर आपली फसवणूक झाल्याचे सदर तरुणाच्या ध्यानात आले. त्याने पैशांची मागणी केली असता सदर महिलेने टाळाटाळ सुरू केली. अखेरीस या तरुणाने पोलिसांत धाव घेऊन महिलेविरोधात गुन्हा दाखल केला.