‘इंडिया’त आणखी १३ पक्ष, मुंबईच्या बैठकीत दिसणार ताकद; पवार-ठाकरेंच्या प्रयत्नांना यश
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2023 09:40 AM2023-08-29T09:40:13+5:302023-08-29T09:42:17+5:30
प्रागतिक विकास मंचाचे ‘इंडिया आघाडी’च्या मुंबईतील बैठकीत जयंत पाटील प्रतिनिधित्व करत आहेत.
- सुनील चावके/एस.पी. सिन्हा
नवी दिल्ली : शेकापचे जयंत पाटील आणि स्वाभिमानीचे राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील १३ छोटे-मोठे पक्ष आणि सामाजिक संघटनांचा समावेश असलेला ‘प्रागतिक विकास मंच’ मुंबईत होत असलेल्या ‘इंडिया आघाडी’मध्ये सामील होणार आहे. याचवेळी एनडीएच्या बैठकीत सहभागी ३८ पक्षांपैकी चार पक्ष विरोधी आघाडीच्या संपर्कात असल्याचा दावाही काँग्रेसने केला आहे.
प्रागतिक विकास मंचाचे ‘इंडिया आघाडी’च्या मुंबईतील बैठकीत जयंत पाटील प्रतिनिधित्व करत आहेत. राजकारणात काही महिन्यांपासून सत्ताधारी भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस युती तसेच महाविकास आघाडीपासून ‘प्रागतिक विकास मंचा’ने समान अंतर राखले होते; पण, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि शिवसेना-ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांच्या प्रयत्नांमुळे ‘प्रागतिक विकास मंचा’ने आता ‘इंडिया आघाडी’च्या व्यासपीठावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.
२०१९ मध्ये बजावली महत्त्वाची भूमिका...
- २०१९ साली महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यातही ‘प्रागतिक विकास मंचा’ने महत्त्वाची भूमिका बजावली होती.
- महाराष्ट्रात २०२४ ची लोकसभा निवडणूक अतिशय अटीतटीची होण्याची चिन्हे असून, महाराष्ट्राच्या पाच ते सहा जिल्ह्यांमध्ये प्रभाव असलेल्या या १३ पक्षांच्या समूहामुळे राज्यभर विखुरलेल्या पुरोगामी मतांचा ‘इंडिया आघाडी’ला लाभ होईल, असे गणित मांडले जात आहे.
देशपातळीवर ‘इंडिया’ महाराष्ट्रात ‘मविआ’
समाजवादी पार्टी, शेतकरी कामगार पक्ष, डॉ. सुरेश माने यांची बहुजन विकास पार्टी तसेच डाव्या आणि रिपब्लिकन विचारांचे नेते आणि सामाजिक संघटनांचा त्यात समावेश आहे. तेरा पक्षांचा हा मंच राष्ट्रीय राजकारणात ‘इंडिया आघाडी’चा, तर राज्याच्या राजकारणात महाविकास आघाडीचा घटक असेल.
‘मला फक्त सर्वांना एकत्र आणायचे आहे’
- बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची ‘इंडिया’च्या संयोजकपदी नियुक्ती करण्यावरून बरेच राजकारण होत आहे.
- अशा स्थितीत समन्वयक बनविण्याच्या प्रश्नावर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा स्पष्टपणे सांगितले की, मला काहीही बनायचे नाही आणि कोणतीही इच्छा नाही.
- मी ही बाब पुन्हा पुन्हा सांगत आहे आणि पुन्हा सांगतो की, मला फक्त सर्वांना एकत्र आणायचे आहे.
डिसेंबरमध्ये लोकसभा? भाजपने सर्व हेलिकॉप्टर घेतली भाड्याने...
केंद्रातील सत्ताधारी भाजप येत्या डिसेंबर महिन्यात लोकसभा निवडणुका घेण्याची शक्यता असल्याचा दावा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे. भाजपने सर्व हेलिकॉप्टर भाड्याने घेतली असून त्यांचा लोकसभा निवडणुकांतील प्रचारासाठी उपयोग करणार असल्याचे ममता बॅनर्जी यांनी सांगितले.
ममता बॅनर्जी म्हणाल्या की, भाजप केंद्रात तिसऱ्यांदा सत्तेवर आला तर देशाला त्याचे परिणाम भोगावे लागतील. कोणत्याही राजकीय पक्षाला निवडणूक प्रचारासाठी हेलिकॉप्टरचा वापर करता येऊ नये यासाठी भाजपने ही खेळी केली आहे.
आगामी लोकसभा
निवडणुका २०२४ मध्ये होणे अपेक्षित असताना त्याआधी भाजप निवडणुका घेऊ शकतो. आम्ही आगामी लोकसभा निवडणुकांत भाजपला पराभूत करू.