दोन मंत्री, सात आमदारांना डच्चू; हरयाणा निवडणुकीसाठी भाजपकडून १३ नवे चेहरे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2024 06:40 AM2024-09-11T06:40:48+5:302024-09-11T06:41:45+5:30

दोन मुस्लीम उमेदवारही, पक्षाने फिरोजपूर झिरका येथून नसीम अहमद आणि पुन्हाणा येथून एजाज खान यांना उमेदवारी दिली आहे.

13 new faces from BJP for Haryana elections, Two ministers, seven MLAs were rejected | दोन मंत्री, सात आमदारांना डच्चू; हरयाणा निवडणुकीसाठी भाजपकडून १३ नवे चेहरे

दोन मंत्री, सात आमदारांना डच्चू; हरयाणा निवडणुकीसाठी भाजपकडून १३ नवे चेहरे

बलवंत तक्षक

नवी दिल्ली / चंडीगड : भारतीय जनता पक्षाने मंगळवारी हरयाणा विधानसभा निवडणुकीसाठी २१ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. यात भाजप प्रदेशाध्यक्ष मोहन बडौली यांच्यासह दोन मंत्री आणि ७ आमदारांचे तिकीट कापण्यात आले आहे. पिहोवा मतदारसंघातील उमेदवारही बदलण्यात आला आहे. याचवेळी दोन मुस्लीम उमेदवारांना मैदानात उतरवत नवी चाल खेळली आहे.

हरयाणातील सत्ताधारी पक्षाने अद्याप महेंद्रगड, एनआयटी फरिदाबाद आणि सिरसा या जागांसाठी उमेदवार जाहीर केलेले नाहीत. जुलाना विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार विनेश फोगाट यांच्याविरुद्ध लढण्यासाठी पक्षाने युवा नेते कॅप्टन योगेश बैरागी यांना उमेदवारी देत ही लढत प्रतिष्ठेची केली आहे. 

कुठून कुणाला उमेदवारी? मुख्यमंत्री कुठून लढणार? 

भाजपने मंत्री बनवारीलाल यांचे तिकीट रद्द करून त्यांच्या जागी कृष्ण कुमार यांना उमेदवारी दिली आहे. पक्षाने बढकलचे सध्याचे आमदार आणि शालेय शिक्षण मंत्री सीमा त्रिखा यांनाही तिकीट दिलेले नाही. सोहनातून मंत्री संजय सिंह यांना मुस्लीमबहुल नुह येथून तिकीट दिले आहे. 

भाजपने गणौर, पतौडी, हथीन आणि होडल या जागेवरील विद्यमान आमदारांची तिकिटे रद्द करून नव्या चेहऱ्यांवर विश्वास व्यक्त केला आहे.
हरयाणाचे मुख्यमंत्री आणि कर्नालचे विद्यमान आमदार नायब सिंग सैनी यांना कुरुक्षेत्र जिल्ह्यातील लाडवा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. पक्षाने फिरोजपूर झिरका येथून नसीम अहमद आणि पुन्हाणा येथून एजाज खान यांना उमेदवारी दिली आहे.

कॅप्टन अन् खेळाडू एकमेकांसमोर उभे ठाकणार

जुलाना येथे भाजपने युवा नेते आणि एअर इंडियाची नोकरी सोडून राजकारणात आलेले कॅप्टन योगेश कुमार बैरागी यांना काँग्रेसच्या उमेदवार विनेश फोगट यांच्या विरोधात उमेदवारी देण्यात आली आहे. सफिदोनचे रहिवासी असलेले योगेश सध्या भाजप युवा मोर्चाच्या हरयाणा विभागाचे उपाध्यक्ष आहेत. भाजपने बुधवारी जाहीर केलेल्या पहिल्या यादीत ६७ उमेदवारांची घोषणा केली होती. त्यानंतर पक्षाला बंडखोरीचा सामना करावा लागला होता.

विनेशचे काका म्हणाले

महिला कुस्तीपटू विनेश फोगटचे काका आणि कुस्ती प्रशिक्षक महावीर फोगट म्हणाले की, विनेशने यावेळी राजकारणात येण्याची गरज नव्हती. महावीर यांची मुलगी व ऑलिम्पियन बबिता फोगाट यांनी भाजपतर्फे २०१९ मध्ये दादरीमधून विधानसभा लढविली होती, पण त्या हरल्या होत्या.

आपची यादीही जाहीर

आपनेही हरयाणासाठी नऊ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली, यात माजी मंत्री छत्रपाल सिंह यांना बरवाला येथून उमेदवारी देण्यात आली आहे. सिंह यांनी एक दिवस अगोदर भाजपमधून आपमध्ये प्रवेश केला होता. काँग्रेससोबत जागावाटपाची चर्चा अयशस्वी झाल्यानंतर पक्षाने सोमवारी २० उमेदवारांची यादी जाहीर केली.

Web Title: 13 new faces from BJP for Haryana elections, Two ministers, seven MLAs were rejected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.