दुकानातील स्फोटात १३ जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2019 05:58 AM2019-02-24T05:58:51+5:302019-02-24T05:58:57+5:30
उत्तर प्रदेशातील दुर्घटना
भदोही : उत्तर प्रदेशच्या भदोही जिल्ह्यात चौरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रोहता बाजारात शनिवारी एका दुकानात झालेल्या स्फोटात १३ जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत ६ जण जखमी झाले आहेत. हा स्फोट एवढा मोठा होता की, आजूबाजूचे तीन घरे उद्ध्वस्त झाली. ज्या दुकानात स्फोट झाला तो दुकानदार फटाक्यांचा अवैध व्यापार करत होता, असे सांगितले जात आहे.
काही लोक ढिगाऱ्याखाली दबले गेले असण्याची शक्यता आहे. घटनास्थळी मदतकार्य सुरु आहे. जिल्हाधिकारी राजेंद्र प्रसाद यांनी सांगितले की, हा स्फोट कलियर मन्सुरी यांच्या दुकानात झाला. यात मन्सुरी यांचाही मृत्यू झाला. स्थानिक लोकांनी असा दावा केला आहे की, मन्सुरी हे फटाक्यांचा अवैध व्यापार करत होते. अधिकारी, फॉरेन्सिक तज्ज्ञ व एनडीआरएफची टीम घटनास्थळी पोहचली आहे. (वृत्तसंस्था)