खळबळजनक! मशरूम खाणं बेतलं जीवावर; 'या' ठिकाणी 13 जणांचा मृत्यू; 39 जणांवर उपचार सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2022 11:21 AM2022-04-14T11:21:03+5:302022-04-14T11:22:04+5:30
मशरूम खाणं काही लोकांना चांगलंच महागात पडलं असून ते त्यांच्या जीवावर बेतलं आहे.
नवी दिल्ली - देशात अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. अशीच एक भयंकर घटना आता समोर आली आहे. मशरूम खाणं काही लोकांना चांगलंच महागात पडलं असून ते त्यांच्या जीवावर बेतलं आहे. आसाममधील दिब्रुगडमध्ये आठवडाभरात जंगली विषारी मशरूम खाल्ल्याने 13 जणांचा मृत्यू झाला आहे. तर तब्बल 39 रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेन परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या लोकांपैकी बहुतेकांना किडनी आणि यकृताच्या समस्या होत्या. यामध्ये आतापर्यंत 13 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एएमसीएचचे अधीक्षक डॉ.प्रशांत दिहिंगिया यांनी ही माहिती दिली आहे. दिहिंगिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, विषारी मशरूम खाल्ल्यानंतर आजारी पडलेल्या अनेक लोकांवर अजूनही रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काहींची प्रकृती ठीक आहे. तर यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मागील पाच दिवसांत पूर्व आसाममधील शिवसागर, दिब्रुगड, चराईदेव आणि तिनसुकिया जिल्ह्यातील चहाच्या बागेतील 35 लोकांना AMCH मध्ये दाखल करण्यात आले आहे. तसेच जंगली मशरूम खाल्ल्यानंतर दरवर्षी मोठ्या प्रमाणात लोक आजारी पडतात. हा मशरूम खाण्यायोग्य नाही. जंगली हानीकारक मशरूमच्या सेवनाबाबत सर्वसामान्यांमध्ये जनजागृती करणे अत्यंत आवश्यक आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.