New Wage Code: नव्या वेज कोडसाठी १३ राज्ये तयार, ३ दिवस सुटी, ४ दिवस काम; पगार कमी होणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2021 05:28 PM2021-12-19T17:28:01+5:302021-12-19T17:29:16+5:30
New Wage Code impact on Salary: ज्यांचा पगार पुढील वर्षी कमी वाढेल किंवा वाढणार नाही त्यांच्या हातात येणाऱ्या पगारात कपात होण्याची शक्यता आहे. जाणून घ्या काय होणार बदल.
जर तुम्हाला वाटत असेल की पुढील वर्षी तुमचा पगार वाढणार आहे, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. तुमचा पगार वाढेल परंतू त्याचबरोबर केंद्र सरकारचा एक निर्णय तुमची टेक होम सॅलरी (Take Home Salary) कमी करू शकतो. यामुळे ज्यांचा पगार पुढील वर्षी कमी वाढेल किंवा वाढणार नाही त्यांच्या हातात येणाऱ्या पगारात कपात होण्याची शक्यता आहे.
केंद्र सरकार चार श्रम (वेतन) कायदे (New Wage Code) लागू करणार आहे. पुढील आर्थिक वर्षापासून हे कायदे लागू होण्याची शक्यता आहे. हे कायदे लागू होताच तुमच्या हाती येणारा पगार आणि पीएफ स्ट्रक्टर बदलणार आहे. यामुळे तुमच्या हातातील पगार कमी होणार आहे, तर पीएफमधील रकमेत वाढ होणार आहे.
13 राज्यांमध्ये मसुदा तयार
मजूरी, सामाजिक सुरक्षा, औद्योगिक संबंध आणि व्यवसाय सुरक्षा तसेच आरोग्य आणि काम करण्याच्या स्थितीवर चार श्रम कायदे पुढील वित्त वर्षात लागू होण्याची शक्यता आहे. पीटीआयला एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, 13 राज्यांनी या कायद्याचे मुसदे तयार केले आहेत.
केंद्राने या वेज कोडच्या नियमांना अंतिम स्वरूप दिले आहे, आता राज्यांना त्यांच्या सोईनुसार नियम बनवायचे आहेत. केंद्र सरकारने फेब्रुवारी 2021 मध्येच ही प्रक्रिया पूर्ण केली होती. मात्र, हा विषय राज्यांच्यादेखील अखत्यारीत येत असल्याने राज्यांनी देखील केंद्रासोबतच हे नियम लागू करावेत असे केंद्र सरकारला वाटत आहे. राज्य सरकारे त्यांच्या गरजेनुसार केंद्राच्या नियमांमध्ये बदल करू शकतात.
नव्या वेतन कायद्यानुसार कर्मचाऱ्यांना एकूण पगाराच्या 50 टक्के मूळ वेतन असणार आहे. म्हणजेच भत्ते हे 50 टक्केच असणार आहेत. मूळ वेतन वाढणार असल्याने पीएफदेखील वाढणार आहे. कारण बेसिकवरच पीएफ मोजला जातो. यामुळे कंपन्यांचा वाटा देखील वाढणार आहे. असे झाल्यास कंपन्या सीटीसीमध्ये अॅडजस्ट करून त्याचा भार कर्मचाऱ्याच्या वेतावरच टाकण्याची शक्यता आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना पुढील वर्षी यंदापेक्षा कमी पगार हातात मिळण्याची शक्यता आहे.