कोळसा खाणीत १३ कामगारांचा मृत्यू?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2018 05:16 AM2018-12-15T05:16:00+5:302018-12-15T05:16:22+5:30
अज्ञात व्यक्तीवर गुन्हा : मेघालयातील बेकायदेशीर खाणीत नदीचे पाणी शिरले
शिलाँग : बेकायदेशीररीत्या चालविल्या जाणाऱ्या कोळशाच्या खाणीत नदीचे पाणी शिरून १३ कामगार मरण पावल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
मेघालयमधील पूर्व जैंतिया हिल्स जिल्ह्यामधील क्सान या गावी गुरुवारी सकाळी ही दुर्घटना घडली. पोलिसांनी सांगितले की, लिटेईन नदीच्या जवळ असलेल्या या खाणीत चोरट्या पद्धतीने एक भुयार खणण्याचे काम सुरू होते. त्याचवेळी तेथून नदीचे पाणी प्रचंड वेगाने आत घुसले व त्यात या कामगारांचा मृत्यू झाला. भुयारातील पाणी पंपांद्वारे बाहेर काढल्यानंतर मृतदेहांचा शोध घेण्यात येईल. याप्रकरणी अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बालमजुरांची होते आर्थिक पिळवणूक
मेघालयातील कोळसा खाणींमध्ये काही हजार बालमजूर काम करीत असतात. त्यांना हे काम देण्यात येऊ नये म्हणून राष्ट्रीय हरित लवादापासून इतर शासकीय संघटनांनी प्रतिबंध घालूनही अद्याप ही गोष्ट थांबलेली नाही.
या बालमजुरांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक पिळवणूक होत असते. गुरुवारी घडलेल्या घटनेत मरण पावलेल्या कामगारांमध्ये किती बालमजूर होते हे अजून स्पष्ट झालेले नाही.
नांगालबिब्रा येथे एका खाणीत २०१२ साली भुयार खणताना १५ कामगार मरण पावले होते.