खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2024 09:46 AM2024-05-07T09:46:54+5:302024-05-07T09:47:59+5:30
तक्रारदाराने फुटिरतावादी गुरपतवंत सिंगच्या एका व्हिडिओचा संदर्भ देत केजरीवालांच्या नेतृत्वातील आम आदमी पार्टीला २०१४ ते २०२२ या काळात विविध समुहांकडून १६ मिलियन अमेरिकन डॉलर मिळाल्याचा दावा केला
नवी दिल्ली - दिल्लीचे उपराज्यपाल वी.के सक्सेना यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात एनआयए तपास करण्याची शिफारस केली आहे. उपराज्यपालांना मिळालेल्या तक्रारीनुसार, आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल यांनी पक्षासाठी निर्बंध लावलेल्या दहशतवादी संघटना सिख फॉर जस्टिसकडून फंडिंग घेतले. १ एप्रिल २०२४ रोजी याबाबत वर्ल्ड हिंदू फेडरेशन ऑफ इंडिया नावाच्या संस्थेने उपराज्यपालांना तक्रार दिली होती. त्यात आम आदमी पार्टीला मिळणाऱ्या फंडची आणि आयकर स्त्रोताची चौकशी करण्याची मागणी केली होती.
या तक्रारीचं गांभीर्य लक्षात घेऊन उपराज्यपालांनी ३ मे रोजी केंद्रीय गृहमंत्रालयाला पत्र लिहिलं. त्यात प्राप्त तक्रारीनुसार संबंधित प्रकरणाची NIA चौकशी करण्यात यावी अशी शिफारस करण्यात आली आहे. केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पार्टीला अतिरेकी फुटीरतावादी गटांकडून १६ मिलियन अमेरिकन डॉलर (सुमारे १३० कोटी रुपये) इतकी मोठी रक्कम मिळाली होती. ही तक्रार मुख्यमंत्र्यांच्या विरोधात करण्यात आली आहे आणि ती प्रतिबंधित दहशतवादी संघटनेकडून मिळालेल्या राजकीय निधीशी संबंधित आहे. अशा स्थितीत तक्रारदाराने दिलेल्या इलेक्ट्रॉनिक पुराव्याच्या फॉरेन्सिक तपासणीसह अन्य पातळ्यांवर सखोल तपास करण्याची गरज आहे असं उपराज्यपालांनी म्हटलं.
उपराज्यपालांनी शिफारस पत्रात केजरीवालांकडून २०१४ मध्ये इकबाल सिंह यांना लिहिलेल्या पत्राचा हवाला देण्यात आला. केजरीवाल यांनी या पत्रातून सिखांबद्दल अनेक मुद्द्यांवर सहानुभूती व्यक्त केली होती. इतके नाही तर त्यांच्या सरकारने भुल्लर यांच्या सुटकेसाठी राष्ट्रपतींना शिफारस केली आहे. भुल्लर यांच्या सुटकेसाठी इकबाल सिंह जंतर मंतरवर उपोषणाला बसले होते. अरविंद केजरीवाल यांच्या भेटीनंतर त्यांनी उपोषण मागे घेतले होते. तक्रारदाराने फुटिरतावादी गुरपतवंत सिंगच्या एका व्हिडिओचा संदर्भ देत केजरीवालांच्या नेतृत्वातील आम आदमी पार्टीला २०१४ ते २०२२ या काळात विविध समुहांकडून १६ मिलियन अमेरिकन डॉलर मिळाल्याचा दावा केला. त्यात आपचे माजी नेते डॉ. मुनीश रायजादा यांच्या सोशल मीडियातील पोस्टचाही हवाला दिला.
'आप'ने फेटाळले आरोप, भाजपा टार्गेट
आम आदमी पक्षाकडून फंडिंगबाबत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावरील आरोप हे भाजपाचे षडयंत्र असल्याचं म्हटलं आहे. आपचे नेते आणि मंत्री सौरभ भारद्वाज यांनी म्हटलं की, प्रत्येक निवडणुकीवेळी अशाप्रकारचे बिनबुडाचे आरोप लावणे हे भाजपाचे राजकीय षडयंत्र आहे. भाजपाने २०२२ मध्ये पंजाब विधानसभा निवडणुकीवेळीही हेच आरोप केले होते. त्यावेळी गृहमंत्री अमित शाह यांनी तपासही केला. परंतु त्यात काही हाती आलं नाही. आता पुन्हा एकदा तेच आरोप केले जात आहेत असं सांगत आम आदमी पार्टीने आरोप फेटाळले.
दरम्यान, भाजपाच्या इशाऱ्यावर उपराज्यपालांनी केजरीवालांविरोधात NIA तपासाची शिफारस केली आहे कारण लोकसभा निवडणुकीत भाजपाला त्यांचा पराभव स्पष्ट दिसत आहे. उपराज्यपाल हे भाजपाच्या हातातील बाहुलं आहे. जेव्हा निवडणुकीत पराभव दिसतो तेव्हा भाजपा आरोप करते जेणेकरून जनतेची दिशाभूल होईल. अरविंद केजरीवाल यांच्याविरोधातील चौकशीत याआधीही काही निघाले नाही आणि आताही काही निघणार नाही असंही सौरभ भारद्वाज यांनी म्हटलं.