नोटाबंदीच्या निर्णयानंतर 130 कोटींचा ऐवज जप्त

By Admin | Published: December 24, 2016 01:47 AM2016-12-24T01:47:56+5:302016-12-24T01:47:56+5:30

८ नोव्हेंबर रोजी नोटाबंदीचा निर्णय लागू झाल्यापासून देशभरात १३0 कोटी रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

130 crore worth of money seized after the decision of the nail-locking | नोटाबंदीच्या निर्णयानंतर 130 कोटींचा ऐवज जप्त

नोटाबंदीच्या निर्णयानंतर 130 कोटींचा ऐवज जप्त

googlenewsNext

नवी दिल्ली : ८ नोव्हेंबर रोजी नोटाबंदीचा निर्णय लागू झाल्यापासून देशभरात १३0 कोटी रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. त्यात रोख रक्कम आणि दागदागिन्यांचा समावेश आहे. या काळात करदात्यांनी सुमारे २ हजार कोटींची बेहिशेबी मालमत्ता जाहीर केली आहे. वित्त मंत्रालयाच्या वतीने ही माहिती जारी करण्यात आली आहे. नोटाबंदीच्या निर्णयानंतर आयकर विभागाने देशात सुमारे ४00 धाडी टाकल्या. त्यात जुन्या आणि नव्या नोटा, तसेच दागिने जप्त करण्यात आले. त्यांची एकत्रित किंमत १३0 कोटींपेक्षा जास्त आहे. त्यातच करदात्यांनी सुमारे २ हजार कोटी रुपयांचे उत्पन्न या काळात जाहीर केले.
२८ नोव्हेंबर रोजी सरकारने पंतप्रधान गरीब कल्याण योजना जाहीर केली. त्यानंतर हे उत्पन्न करदात्यांनी जाहीर केले आहे. या उत्पन्नावर ५0 टक्के कर लागणार असून, २५ टक्के रक्कम ४ वर्षांसाठी बिनव्याजी ठेव म्हणून सरकारकडे राहणार आहे. त्याआधी जाहीर करण्यात आलेल्या उत्पन्न प्रकटीकरण योजनेतील जाहीर उत्पन्नाचा नवा आकडा सरकारने जारी केला आहे. त्यानुसार, ६७,३८२ कोटी रुपये या योजनेत जाहीर झाल्याचे सांगण्यात आले. १ जून ते ३0 सप्टेंबर या काळात ही योजना कार्यरत होती.
त्याआधी गेल्या वर्षी सरकारने काळा पैसा (विदेशातील अघोषित उत्पन्न व मालमत्ता) आणि कर वसुली कायदा २0१५ नुसार विदेशातील उत्पन्न व मालमत्तांच्या ६४४ घोषणा सरकारला मिळाल्या. त्यातून २,४२८ कोटींचा महसूल मिळाला आहे. त्यातील सुमारे ३0 प्रकरणे ईडीकडे सुपूर्द करण्यात आली आहेत. त्यातील सर्वाधिक १८ प्रकरणे आयकर विभागाच्या बंगळुरू कार्यालयाकडे सोपविण्यात आली आहेत. लुधियाना, भोपाळ येथील कार्यालयांना प्रत्येकी दोन, तर हैदराबाद आणि पुणे येथील कार्यालयांना प्रत्येकी एक प्रकरण सोपविले गेले आहे.
नायजेरियनकडून ५४ लाख रुपये जप्त
नवी दिल्ली : नायजेरियाच्या नागरिकाकडून पोलिसांनी येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर शुक्रवारी ५४ लाख रुपयांच्या नव्या नोटा जप्त केल्या. हा नागरिक कोईमतूरहून येथे आल्यावर त्याला केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांनी रात्री अडीचचच्या सुमारास हटकले.
कस्टम्स आणि कर अधिकाऱ्यांना हवी असलेली माहिती त्याने दिल्यानंतर त्याला प्रवासाची परवानगी देण्यात आली. त्याच्याकडे ५८ लाख रुपये होते त्यातील. ४.२९ लाख रुपये बाद झालेल्या नोटांतील होते.
कचऱ्यात हजारच्या नोटा
नोटाबंदीनंतर काळा पैसा बाहेर येऊ लागला असतानाच काही लोक तो फेकून देत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. एकाने लखनौमध्ये एका नाल्यात हजारच्या नोटा फेकल्या. त्या कचरा वेचणाऱ्या मुलाला सापडल्या आणि चालतील या आशेने त्याने त्या वाळतही घातल्या.
कारचालक ७ कोटींचा धनी
हैदराबाद : उबेर कारचालकाच्या बँक खात्यात सात कोटी रुपये जमा झाल्याचे पाहून प्राप्तीकर विभागाच्या अधिकाऱ्यांना धक्काच बसला. नोटाबंदीनंतर ज्या खात्यांमध्ये फार मोठ्या रकमा भरल्या गेल्या त्यांची छाननी सुरू झाल्यानंतर प्राप्तीकर विभागाचे येथील गुप्तचर अधिकारी येथील उबेर कारचालकाच्या खात्यापाशी थबकले.
नोटांबदीनंतर नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यानंतर सात कोटी रुपये स्टेट बँक आॅफ हैदराबादच्या खात्यात जमा करण्यात आले होते. हैदराबाद बँकेच्या एका शाखेत उबेर कारचालकाचे खाते असून ते नोटाबंदीच्या निर्णयाआधीच बंद होते, असे प्राप्तीकर अधिकाऱ्यांनी सांगितले. त्याच्या खात्यात पैसे जमा केल्यानंतर लगेचच ते तुकड्या तुकड्यात आरटीजीएस पद्धतीने सोन्याचांदीच्या व्यापाऱ्याच्या खात्यात पाठविले गेले.
उबेर कारचालकाला तुझ्या खात्यात एवढे पैसे कसे जमा झाले व त्यातून रक्कम कशी पाठविली गेली याबद्दल विचारले असता त्याला पैसे कुठून आले ते सांगता आलेले नाही, असे प्राप्तीकर अधिकारी म्हणाले.

Web Title: 130 crore worth of money seized after the decision of the nail-locking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.