पीएम-किसानमध्ये अपात्र शेतकऱ्यांना १,३६४ कोटी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2021 03:40 AM2021-01-13T03:40:41+5:302021-01-13T03:41:11+5:30
केंद्र सरकारने २०१९ मध्ये पीएम-किसान योजना सुरू केली होती. या योजनेंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला वर्षाला ६ हजार रुपयांची आर्थिक मदत तीन समान हप्त्यांत दिली जाते.
नवी दिल्ली : पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी (पीएम- किसान) योजनेत २०.४८ लाख अपात्र शेतकऱ्यांना १,३६४ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला, अशी माहिती समोर आली आहे.
केंद्र सरकारने २०१९ मध्ये पीएम-किसान योजना सुरू केली होती. या योजनेंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला वर्षाला ६ हजार रुपयांची आर्थिक मदत तीन समान हप्त्यांत दिली जाते. ‘कॉमनवेल्थ ह्यूमन राइटस् इनिशिएटिव्ह’ (सीएचआरआय) या संस्थेचे वेंकटेश नायक यांनी सादर केलेल्या माहिती अधिकार याचिकेवर केंद्रीय कृषी मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, अयोग्य शेतकऱ्यांची ‘अपात्र शेतकरी’ आणि ‘प्राप्तिकरदाता शेतकरी’ अशी दोन गटांत विभागणी करण्यात आली आहे. यातील ५५.५८ टक्के शेतकरी प्राप्तिकर दाते आहेत. उरलेले ४४.४१ टक्के शेतकरी ‘अपात्र शेतकरी’ या गटातील आहेत. त्यांच्याकडून ही रक्कम वसूल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
नायक यांनी सांगितले की, ३१ जुलै २०२० पर्यंत १,३६४.१३ कोटी रुपये अयोग्य शेतकऱ्यांना वितरित केले गेले आहेत. निधी चुकीच्या हाती पडल्याचे सरकारी आकडेवारीवरूनच दिसून येते. बहुतांश अयोग्य शेतकरी पंजाब, आसाम, महाराष्ट्र, गुजरात आणि उत्तर प्रदेश या पाच राज्यांतील आहेत. पंजाबातील सर्वाधिक २३.१६ टक्के (४.७४ लाख लाभार्थी) अयोग्य शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळाला.