पाकच्या १४ सीमा चौक्या उद्ध्वस्त
By admin | Published: November 2, 2016 06:27 AM2016-11-02T06:27:40+5:302016-11-02T06:27:56+5:30
भारतीय सीमेवरील गावांतील दोन लहान मुले आणि चार महिलांसह आठ निष्पाप लोक मरण पावले.
जम्मू : पाकिस्तानी रेंजर्स शस्त्रसंधीचे उल्लंघन करून आंतरराष्ट्रीय सीमेवर आणि नियंत्रण रेषेलगत सातत्याने तोफांचा मारा आणि गोळीबार करीत असून, मंगळवारी त्यात भारतीय सीमेवरील गावांतील दोन लहान मुले आणि चार महिलांसह आठ निष्पाप लोक मरण पावले. त्यामुळे सीमा सुरक्षा दलानेही प्रत्युत्तरादाखल अतिशय आक्रमकपणे गोळीबार केला. त्यात पाकच्या १४ चौक्या उद्ध्वस्त केल्या आणि त्यात तीन पाकिस्तानी जवानांना ठार केले.
अनेक पाकिस्तानी रेंजर्स जखमी झाल्याचे वृत्त असून, त्यापैकी काही जण गंभीर असल्याचे सांगण्यात येते. सीमा सुरक्षा दलाच्या गोळीबारात पाकिस्तानच्या
१४ चौक्या उद्ध्वस्त होताच, त्या भागांतील पाक रेंजर्स घाबरून पळून गेल्याचे वृत्त आहे. त्या भागांत काही रुग्णवाहिकाही दिसत होत्या. चार दिवसांपूर्वी याच पद्धतीने पाकच्या चार चौक्या नष्ट करण्यात आल्या होत्या. त्यात पाकिस्तानचे २0 रेंजर्स मरण पावले होते.
सांबा जिल्ह्यातील रामगढ विभागात तोफांच्या माऱ्यामुळे पाच जण ठार तर नऊ जण जखमी झाले, असे सांबाच्या उपायुक्त शीतल नंदा यांनी सांगितले. तोफमाऱ्यामुळे मानसिक धक्का बसून एक जण मरण पावला त्यामुळे या भागातील मृतांची संख्या आठ झाली.
नियंत्रण रेषेवरील राजौरी जिल्ह्यात मंजाकोटे येथे पंजग्रियन या सीमेवरील छोट्या खेड्यात पाकिस्तानी सैन्याने केलेला जोरदार तोफांचा मारा व गोळीबारात दोन महिला ठार झाल्या, असे राजौरीचे उपायुक्त शबीर अहमद भट म्हणाले. लष्कराचे तीन मालवाहक नौशेरा विभागात जखमी झाले. पाकिस्तानच्या तोफांचे गोळे पूंछ जिल्ह्यातील मेंढर गावात पडले. त्यात तीन जण जखमी झाले.
पाकिस्तानी सैन्याने पहाटे सांबा विभागाच्या रामगढ आणि अर्निया भागात व जम्मू जिल्ह्यात छोट्या तोफांचा मारा सुरू केला. नंतर चार ते पाच ठिकाणी जोरदार मारा सुरू केला, असे सीमा सुरक्षा दलाचे (जी) महासंचालक धर्मेंद्र पारीक यांनी सांगितले.
सीमेपलीकडून ८२ एमएम तोफगोळ्यांचा मारा अधूनमधून झाला. सीमा सुरक्षा दलाने त्याला चोख प्रतिउत्तर दिले. रामगढ विभागातील (सांबा जिल्हा) छोट्या खेड्यात झालेल्या तोफमाऱ्यात २१ व २२ वर्षे वयाच्या दोन तरुण महिला ठार झाल्या, असे सांबाचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक जोगिंदर सिंग म्हणाले.
सोमवारपासून पाकिस्तानी सैन्याकडून सुरू असलेल्या गोळीबारात सहा जण जखमी झाले. मंगळवारी सकाळी ७.१० वाजता पिंडी खेड्यात पडलेल्या तीन तोफगोळ्यांमुळे बोदराज (४४), निकी, धरना देवी आणि चंचला देवी (४९) जखमी झाले. मेंढर (जि. पूंछ) विभागात पाकिस्तानी सैन्याने सोमवारी सायंकाळी केलेल्या तोफमाऱ्यात रोबिया कौसर (२८) व तस्वीर बी (२४) जखमी झाल्या. (वृत्तसंस्था)
>पाकच्या कुरापती : आठ निष्पाप भारतीय मृत
सर्जिकल स्ट्राइक्सनंतर पाकिस्तानने ६0 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. कुरापती काढण्याचे काम पाक रेंजर्स करीत असून, त्यांना जशास तसे उत्तर बीएसएफचे जवान देत आहेत. पाकिस्तानी रेंजर्सच्या १४ चौक्या उद्ध्वस्त करण्याआधी सांबा, जम्मू व पूंछ भागातील नागरी वस्त्यांसोबत भारतीय चौक्यांना लक्ष्य करून पाकिस्तानी फौजा सातत्याने उखळी तोफांचा मारा आणि गोळीबार करीत होते. यात आठ भारतीय नागरिक ठार, तर अन्य २२ जण जखमी झाले. मृतांमध्ये बव्हंशी महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे.
पाक रेंजर्सच्या बेछूट गोळीबार व तोफांच्या माऱ्यांमुळे भारतीय सीमेवरील गावांत राहणारे लोक जखमी वा मृत होत आहेत. अशा स्थितीत सीमेवरील सर्व १७४ शाळा बंद ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
आजच्या या प्रकारानंतर गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी बीएसएफ अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि त्यांच्याकडून माहिती घेतली. तसेच पाक रेंजर्सना जोरदार उत्तर द्या, असेही त्यांनी सांगितले. बैठकीला संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर व लष्करप्रमुखही उपस्थित होते.