हज दुर्घटनेत १४ भारतीयांचा मृत्यू, १३ जखमी
By admin | Published: September 25, 2015 11:31 AM2015-09-25T11:31:01+5:302015-09-25T15:07:14+5:30
हज दुर्घटनेतील मृतांमध्ये १४ भारतीय भाविकांचा समावेश असून १३ जण जखमी झाल्याचे परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी सांगितले.
Next
>ऑनलाइन लोकमत
रियाध, दि. २५ - सौदी अरेबियातील हज यात्रेत गुरूवारी झालेल्या चेंगराचेंगरीत १४ भारतीयांचा मृत्यू झाला असून १३ जण जखमी झाले आहेत. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी ट्विट करून ही माहिती दिली असून १३ जखमींवर उपचार सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. मीना शहरात काल सकाळी झालेल्या या दुर्घटनेत आत्तापर्यंत ७१७ भाविक मृत्यूमुखी पडले असून सुमारे ८६० जण जखमी झाले आहेत. गेल्या दोन दशकातील ही सर्वात भीषण दुर्घटना आहे.
मीना शहरात काल सकाळी आठच्या सुमारास भाविकांची प्रचंड गर्दी उसळली होती. सैतानाला दगड मारण्याच्या वेळी (एक धार्मिक प्रथा) गर्दी झाल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे सांगितले जात आहे. १४ भारतीय मृतांमध्ये गुजरातमधील ९ भाविकांचा तर झारखंड व तामिळनाडूतील प्रत्येकी २ व महाराष्ट्रातील १ भाविकाचा समावेश आहे. तसेच १३ जखमींपैकी १ भाविकही महाराष्ट्रातील आहे.
या दुर्घटनेचे नेमके कारण समजू शकले नसले तरी प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार एका अरुंद जागी ही दुर्घटना झाली. काही भाविक सैतानाला दगड मारण्याच्या प्रथेसाठी एका रस्त्याने जात होते, तर ही प्रथा पूर्ण करून आलेले भाविक याच रस्त्याने परत येत होते. त्यामुळे रस्ता बंद होऊन ही चेंगराचेंगरी झाली असावी असा अंदाज वर्तविला जात आहे. प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्यानुसार दुसरा एक अंदाज वर्तविला जात आहे की, सुरक्षारक्षक भाविकांना थांबविण्याचा प्रयत्न करत होते आणि पुढे न जाण्याविषयी विनंती करत होते; पण भाविक न थांबता या रस्त्याने पुढे जाऊ लागले आणि चेंगराचेंगरी झाली.
सुषमा स्वराज यांनी मक्का येथील इमर्जन्सी नंबरही दिला आहे :
00966125458000
00966125496000
सौदीतील भाविकांसाठी टोल फ्री क्रमांक : 8002477786