काँग्रेसचे १४ आमदार जदयूमध्ये जाणार? ज्योतिरादित्य शिंदे यांनी घेतली नाराजांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2017 12:45 AM2017-09-03T00:45:28+5:302017-09-03T00:46:06+5:30
बिहार विधानसभेतील काँग्रेसच्या २७ पैकी १४ आमदारांनी एक वेगळा गट स्थापन केला असून, हा गट सत्ताधारी जनता दलात (युनायटेड) सामील होण्याच्या मार्गावर असल्याचे समजते.
पाटणा/नवी दिल्ली: बिहार विधानसभेतील काँग्रेसच्या २७ पैकी १४ आमदारांनी एक वेगळा गट स्थापन केला असून, हा गट सत्ताधारी जनता दलात (युनायटेड) सामील होण्याच्या मार्गावर असल्याचे समजते. आणखी चार आमदार मिळाले तर फुटिरांना पक्षांतरबंदी कायद्याचेही बंधन राहणार नाही.
या फुटीर आमदारांच्या हालचालींची कुणकुण लागताच पक्षश्रेष्ठींनी बिहार प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चौधरी व
विधिमंडळ पक्षाचे नेते सदानंद सिंह यांना दोनच दिवसांपूर्वी दिल्लीला बोलावून घेतले होते. तेथे पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी दोघांनाही आमदारांवर लक्ष ठेवण्यास बजावल्याचे सांगितले होते. मात्र वेगळा गट स्थापन करू पाहणाºयांमध्ये अशोक चौधरी व सदानंद सिंह यांचाच पुढाकार होता आणि त्यांनी सोनिया गांधींना भेटल्यानंतर आपण काँग्रेसमधून बाहेर पडणार नसल्याचे जाहीरही केले होते. तरीही लगोलग श्रेष्ठींचे प्रतिनिधी म्हणू खासदार ज्योतिरादित्य शिंदे हेही पाटण्यात आले व त्यांनी नाराज आमदारांची
भेट घेतली. दिल्लीत पक्षप्रवक्ते
आनंद शर्मा यांनी बिहार
काँग्रेसमध्ये फूट पाडण्याचे प्रयत्न चालविल्याबद्दल मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नावे आगपाखड
केली. त्यांच्या या प्रयत्नांना यश येणार नाही, अशी खात्रीही आनंद शर्मा व्यक्त केली आहे. (वृत्तसंस्था)
नितीशकुमारांना नाही गरज
सूत्रांनुसार मात्र या आमदारांना पक्ष रोखू शकेल असे वाटत नाही. याआधी नितीश कुमारांच्या नेतृत्वाखाली महागठबंधन सरकार होते, तेव्हा यापैकी सहा जण मंत्री होते. इतरांना महामंडळे व अन्यत्र वर्णी लागेल, अशी आशा होती. परंतु नितीशबाबुंनी महागठबंधन सोडून भाजपाशी जवळीककेल्याने या आमदारांना भवितव्य अनिश्चित वाटू लागले.
बहुमतासाठी नितीश कुमार यांना या आमदारांच्या पाठिंब्याची गरज आहे, असे नाही. त्यामुळे या आमदारांकडे फारशी ‘बार्गेनिंग पॉवर’ही उरलेली नाही.