खेळताना बादलीत पडून 14 महिन्याच्या मुलीचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2017 10:06 AM2017-07-27T10:06:32+5:302017-07-27T10:08:47+5:30
- पाण्याने भरलेल्या बादलीत पडून एका चौदा महिन्याच्या चिमुरडीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
नवी दिल्ली, दि.27- पाण्याने भरलेल्या बादलीत पडून एका चौदा महिन्याच्या चिमुरडीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ती तिच्या आई-वडिलांची एकुलती एक मुलगी मुलगी असल्याची माहिती समोर येते आहे. नवी दिल्लीतील नांगलोई भागातील अमर कॉलनीमध्ये ही घटना घडली आहे. सृष्टी असं त्या मृत्यू झालेल्या चिमुरडीचं नावं आहे. घरातील सगळी लोक इतर कामात व्यस्त असताना ही घटना घडली आहे. ही मुलगी जेव्हा घरातील तिच्या खोलीमध्ये दिसली नाही तेव्हा तिला घरच्यांनी आजूबाजूला शोधलं पण ती सापडली नाही. त्यानंतर घरच्यांनी बाथरूम तपासल्यावर ती बाथरूममधील पाण्याने भरलेल्या बादलीत पडलेली दिसली. तिच्या कुटुंबीयांनी तिला लगेचच उपाचारासाठी हॉस्पिटलमध्ये नेलं पण तिथे तिला मृत घोषित करण्यात आलं.
हॉस्पिटलकडून पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी या घटनेची नोंद केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी मुलीची आई आणि इतरांकडे चौकशी केली असून या घटनेचा अधिक तपास सुरू झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नांगलोई भागातील अमर कॉलनीतील के-ब्लॉकमध्ये राहणाऱ्या एका कुटुंबातील १४ महिन्यांची मुलगी गॅलरीमध्ये खेळत होती. त्यांच्या घरात दुरूस्तीचं काम सुरू होतं. सृष्टीची आई त्या कामाकडे लक्ष देत होती. तेव्हा खेळता खेळता सृष्टी बाथरूममध्ये गेली. कामात व्यस्त असल्याने सृष्टीच्या आईचं लक्ष तिच्याकडे गेलं नाही. काहीवेळानंतर जेव्हा तिच्या आईने पाहिलं तेव्हा ती गॅलरीत नव्हती, अशी माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे. सृष्टीचं कुटुंबीय तिच्या नावाने आवाज देऊन इमारतीच्या बाहेरपर्यंत आले होते. पण त्यांना काहीही माहिती मिळाली नाही. सृष्टी कुठे तरी लपली असेल हा विचार करून त्यांनी घरातील प्रत्येक कोपरा पाहिला. त्यानंतर शेवटी बाथरूम तपासल्यानंतर सृष्टीचं डोकं भरलेल्या पाण्याच्या बादलीत डुबलेलं तिच्या घरच्यांना पाहायला मिळालं.
दरम्यान, या प्रकरणाचा पुढचा तपास केला जातो आहे.