१४ नक्षलींचा खात्मा, एक कोटींचे बक्षीस असलेला सीपीआय (माओवादी) गटाचा नेता ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 07:42 IST2025-01-22T07:42:03+5:302025-01-22T07:42:53+5:30
14 Naxalites killed: छत्तीसगड-ओडिशा सीमेजवळ गरियाबंद जिल्ह्यामध्ये सुरक्षा दलाने चकमकीत १४ नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. त्यात सीपीआय (माओवादी) या संघटनेच्या नेत्याचाही समावेश असून त्याला पकडण्यासाठी सरकारने १ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

१४ नक्षलींचा खात्मा, एक कोटींचे बक्षीस असलेला सीपीआय (माओवादी) गटाचा नेता ठार
रायपूर/भुवनेश्वर - छत्तीसगड-ओडिशा सीमेजवळ गरियाबंद जिल्ह्यामध्ये सुरक्षा दलाने चकमकीत १४ नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. त्यात सीपीआय (माओवादी) या संघटनेच्या नेत्याचाही समावेश असून त्याला पकडण्यासाठी सरकारने १ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. यामुळे नक्षलवादी चळवळीला तडाखा बसला आहे, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंगळवारी सांगितले. हे ऑपरेशन ३६ तासांहून अधिक काळ चालले.
छत्तीसगडच्या गरियाबंद जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक निखिल राखेचा यांनी सांगितले की, खात्मा केलेल्या नक्षलवाद्यांमध्ये जयराम उर्फ चलपती याचा समावेश आहे. तो सीपीआयच्या (माओवादी) केंद्रीय समितीचा सदस्य आहे. त्याला पकडण्यासाठी १ कोटींचे बक्षीस जाहीर केले होते. ठार झालेल्या अन्य नक्षलवाद्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. त्यात दोन महिला नक्षलवाद्यांचाही समावेश आहे.
शाह म्हणाले की, नक्षलवादापासून भारताला मुक्त करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांतील आणखी एक पुढचे पाऊल आम्ही टाकले. ओडिशा, छत्तीसगडच्या सीमा भागात सुरक्षा दलाबरोबर झालेल्या चकमकीत १४ नक्षलवादी ठार झाले. देशात नक्षलवाद आता अखेरच्या घटका मोजत आहे.
पोलिसांनी सांगितले की, चकमकीत ठार झालेल्या नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे, दारुगोळा, आयईडी जप्त करण्यात आले. मंगळवारी देखील सुरक्षा दलाने नक्षलवाद्यांना पकडण्यासाठी शोधमोहीम सुरू ठेवली होती. (वृत्तसंस्था)
भारताची नक्षलवादापासून मुक्तता करण्याचा निर्धार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने केला आहे. हे लक्ष्य आम्ही नक्की साध्य
करणार आहोत.
- अमित शाह, केंद्रीय गृहमंत्री
भाजपच्या नेतृत्वाखालील डबल-इंजिन सरकारच्या कामगिरीमुळे छत्तीसगड
मार्च २०२६ पर्यंत नक्षलवादापासून मुक्त होईल.
- विष्णुदेव साय, मुख्यमंत्री, छत्तीसगड
कोणी पार पाडली मोहीम?
छत्तीसगड पोलिसांच्या जिल्हा राखीव गार्ड (डीआरजी), केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या कोब्रा कमांडो आणि ओडिशा पोलिसांच्या विशेष ऑपरेशन ग्रुप (एसओजी) यांनी ही संयुक्त कारवाई केली.
१ कोटीचे बक्षीस ज्याच्यावर, तो चलपती नेमका कोण होता?
मृत्यू झालेल्या नक्षलवाद्यांमध्ये आंध्र प्रदेशच्या चित्तूर जिल्ह्यातील रहिवासी चलपती याचाही समावेश आहे, त्याच्यावर १ कोटींचे बक्षीस होते. सुरक्षा दलांवर अनेक हल्ले आणि एका आमदाराच्या हत्येमागेही त्याचा हात असल्याचे सांगितले जाते.