14 हजार कोटींचा घोटाळा; भारतात आणल्यावर फरार नीरव मोदीला किती शिक्षा होणार..?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2022 03:07 PM2022-12-16T15:07:36+5:302022-12-16T15:07:46+5:30

पीएनबी घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

14 thousand crore scam; How much will the fugitive Nirav Modi be punished | 14 हजार कोटींचा घोटाळा; भारतात आणल्यावर फरार नीरव मोदीला किती शिक्षा होणार..?

14 हजार कोटींचा घोटाळा; भारतात आणल्यावर फरार नीरव मोदीला किती शिक्षा होणार..?

googlenewsNext


पीएनबी घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाविरोधात दाखल करण्यात आलेली याचिका यूके उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर फरार नीरवला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पण, याला थोडा वेळ लागू शकतो. नीरव मोदी 2018 पासून फरार आहे. 

भारतात आल्यानंतर तपास यंत्रणा आधी त्याची चौकशी करतील आणि नंतर त्याला कोर्टात हजर केलं जाईल. पंजाब नॅशनल बँकेच्या घोटाळ्याच्या तपासाची जबाबदारी सीबीआय आणि ईडीकडे आहे. मुत्सद्देगिरी आणि मानवी हक्कांची योग्य कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, यूके पोलीस नीरवला केंद्रीय तपास संस्थेकडे सोपवतील. यानंतर तपास यंत्रणा नीरवला ब्रिटनमधून भारतात आणेल.

नीरववर कोणते गुन्हे दाखल आहेत?

  • मनी लाँडरिंग प्रकरण- प्राथमिक तपासानंतर सीबीआयने नीरव मोदीविरुद्ध पीएमएलए कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला. यानंतर ईडीनेही चौकशी सुरू केली. पीएमएलए कोर्टाने नीरवला फरार घोषित केले आहे.
  • गुन्हेगारी कट आणि फसवणुकीचे प्रकरण- पीएनबीच्या तक्रारीवरून 29 जानेवारी 2018 रोजी मुंबई पोलिसांनी नीरव मोदीविरुद्ध गुन्हेगारी कट आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. पीएनबीच्या उपमहाव्यवस्थापकांनी ही तक्रार केली आहे.
  • सरकारी कर्मचाऱ्यांचा छळ केल्याचा गुन्हा- सरकारी कर्मचाऱ्यांना त्रास दिल्याप्रकरणी नीरव मोदीविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नीरवने किती रुपयांची फसवणूक केली?
पीएनबीच्या तक्रारीनुसार, नीरव मोदीने 8 हप्त्यांमध्ये सुमारे 14 हजार कोटी रुपयांचे कर्ज घेतले. हे कर्ज फेब्रुवारी 2017 मध्ये घेतले होते. कर्ज घेतल्यानंतर नीरव काही दिवस बँकेची दिशाभूल करत राहिला आणि नंतर भारतातून पळून गेला. सुप्रीम कोर्टाचे वकील ध्रुव गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतात आल्यानंतर ईडी आणि सीबीआय नीरव मोदीची स्वतंत्रपणे चौकशी करतील. ईडीचा तपास मनी लाँड्रिंगवर आधारित असेल, तर सीबीआय गुन्हेगारी कट आणि फसवणुकीची चौकशी करेल.

नीरवची सुरक्षा हेही मोठे आव्हान आहे
नीरव मोदीने ब्रिटनच्या उच्च न्यायालयात सांगितले की, मुंबईतील आर्थर जेलमध्ये त्याच्या जीवाला धोका आहे. नीरवच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात त्याची हत्या होऊ शकते किंवा तो स्वत: आत्महत्या करेल, असे म्हटले होते. भारतात आणल्यानंतर नीरवच्या सुरक्षेचेही मोठे आव्हान आहे. मात्र, नीरवला विशेष कक्षात ठेवण्यात येणार असल्याचे भारत सरकारने यूके उच्च न्यायालयाला सांगितले आहे. त्याला आठवड्यातून एकदा वकिलाला आणि कुटुंबाला भेटण्याची परवानगी दिली जाईल. 

नीरवला काय शिक्षा?
अधिवक्ता ध्रुव गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, नीरवविरोधात तीन कलमांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशा स्थितीत सर्व कलमांमध्ये शिक्षेची वेगळी तरतूद आहे. पीएमएलए अंतर्गत 3 वर्षे आणि त्याहून अधिक सश्रम कारावास होऊ शकतो. जामीन मिळणेही कठीण होईल. फसवणूक प्रकरणात 7 वर्षांपर्यंत कारावास आणि दंड होऊ शकतो. गुन्हेगारी कट रचण्यासाठी अशीच शिक्षा आहे.
 

Web Title: 14 thousand crore scam; How much will the fugitive Nirav Modi be punished

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.