14 तरुणांकडून तरुणीचा विनयभंग
By admin | Published: May 28, 2017 12:08 PM2017-05-28T12:08:16+5:302017-05-28T12:08:16+5:30
उत्तर प्रदेशमधील कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर झाला आहे. रामपूरमध्ये 14 तरुणांच्या टोळीनं मुलीला मारहाण करून तिच्यावर विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
ऑनलाइन लोकमत
रामपूर, दि. 28 - उत्तर प्रदेशमधील कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर झाला आहे. रामपूरमध्ये 14 तरुणांच्या टोळीनं मुलीला मारहाण करून तिच्यावर विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणाचा व्हिडिओ काढून नराधमांनी सोशल मीडियावर अपलोड केला आहे. हा सर्व प्रकार 26 मे रोजी घडला असून त्यातील पीडित मुलगी बेपत्ता आहे. या सर्व प्रकरामुळे उत्तर प्रदेशातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. शिवाय, यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तयार केलेला अॅन्टी रोमिओ स्कॉड असतानाही अशा विनयभंगाच्या घटना कशा काय घडतात यावरही प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.
रामपूरमध्ये एका शेतात दोन मुली आणि एक मुलगा बसलेले होते, तेवढ्यात काही तरूणांची टोळी तिकडे आली. शेतात बसलेल्या या मुला-मुलींना या तिघांनी जबर मारहाण केली. एवढंच नाही तर तिघांमधील एका मुलीसोबत त्यांनी अश्लिल चाळे केले असून तिच्यावर जबरदस्तीदेखील केली. यात पीडित मुलगी बेशुद्ध पडली. तर दुसरीकडे तिच्या मित्रांनी तिला सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनाही या तरूणांच्या टोळीनं मारहाण केली. या सर्व प्रकरणाचा व्हिडिओ बनवून या टोळीनं तो सोशल मीडियावर अपलोड केला. ज्याच्यावरून पोलिसांना याबाबतची माहिती मिळाली.
दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी 14 तरूणांवर गुन्हा दाखल केला असून एकाला अटक केली आहे.