Zika Virus Kanpur: मोठी बातमी! झिका व्हायरसचा कहर, कानपूरमध्ये एकाच वेळी १४ रुग्ण आढळल्यानं खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2021 02:02 PM2021-11-03T14:02:27+5:302021-11-03T14:03:31+5:30
Zika Virus Kanpur: उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये झिका व्हायरसचे एकाच वेळी १४ रुग्ण आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे. या रुग्णांमध्ये एका गर्भवती महिलेचा देखील समावेश असल्याचं सांगितलं जात आहे.
Zika Virus Kanpur: उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये झिका व्हायरसचे एकाच वेळी १४ रुग्ण आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे. या रुग्णांमध्ये एका गर्भवती महिलेचा देखील समावेश असल्याचं सांगितलं जात आहे. शहरातील झिका व्हायरसच्या रुग्णांची संख्या आता २५ वर पोहोचली आहे. एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून आल्यानं डीएमनं मुख्यमंत्री कार्यालयासह आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली आहे.
कानपूरमध्ये झिका व्हायरसच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचं दिसून येत आहे. याआधी १ नोव्हेंबरला झिका व्हायरसचे ६ रुग्ण आढळून आले होते. कानपूरच्या चकेरी भागात हे रुग्ण आढळले. यात ६ पैकी चार महिला रुग्ण आहेत.
झिका व्हायरस एका मच्छरमुळे पसरणारा रोग आहे. एडिज एजिप्ती प्रजातीच्या डासांमुळे झिका व्हायरस माणसांमध्ये पसरतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार एडिज मच्छर सामान्यत: दिवसा चावतात. हेच मच्छर डेंग्यू आणि चिकनगुनिया देखील पसरवतात. दरम्यान, झिका व्हायरस संक्रमण तशी गंभीर समस्या नसली तरी गर्भवती महिलांसाठी झिका व्हायरस खूप धोकादायक ठरू शकतो. याचा बाळासाठी खूप धोका मानला जातो.
झिका व्हायरसची लक्षणं डेंग्यू सारखीच असतात. पण डेंग्यूपेक्षा झिका व्हायरस घातक आणि जीवघेणा समजला जातो. ताप येणं, शरीरावर चट्टे येणं आणि सांध्यांमध्ये दुखणं ही काही प्राथमिक लक्षणं आहेत. कानपूरमध्ये झिका व्हायरसच्या प्रसारामुळे प्रशासनला खडबडून जाग आली आहे. काशीराम रुग्णालयात आता झिका व्हायरसच्या रुग्णांसाठी विशेष वॉर्ड तयार केला गेला आहे. याशिवाय झिका व्हायरसचं संक्रमण रोखण्यासाठी तरतूदी केल्या जात आहेत.