देशात पावसाचे १४८ बळी, आणखी जोरदार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2019 04:43 AM2019-10-01T04:43:15+5:302019-10-01T04:43:36+5:30
बिहार, उत्तर प्रदेशसह देशाच्या अन्य भागात होत असलेल्या मुसळधार पावसाने गत चार ते पाच दिवसांत १४८ जणांचा मृत्यू झाला आहे.
नवी दिल्ली/पाटणा : बिहार, उत्तर प्रदेशसह देशाच्या अन्य भागात होत असलेल्या मुसळधार पावसाने गत चार ते पाच दिवसांत १४८ जणांचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक १११ बळी उत्तर प्रदेशात गेले आहेत, तर बिहारमध्ये २८ जणांचा मृत्यू झाला आहे.
पश्चिम मध्यप्रदेश, सौराष्ट्र आणि कच्छ भागातही जोरदार पाऊस झाला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, २६ सप्टेंबर रोजी ३६ लोकांचा, २७ रोजी १८ जणांचा आणि २८ रोजी २८ नागरिकांचा मृत्यू झाला. २९ रोजी १८ लोक मृत्युमुखी पडले, तर सोमवारी चार जणांचा मृत्यू झाला.
बिहारमध्ये चार ते पाच दिवसांपासून पावसाने कहर केला असून, पावसामुळे झालेल्या विविध दुर्घटनांत २५ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, सोमवारी सकाळपासून पाटण्यात पुन्हा पाऊस सुरू झाल्याने नागरिकांच्या अडचणी वाढल्या आहेत. आगामी दोन दिवसांत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने सांगितले की, गया जिल्ह्यात ६ लोकांचा मृत्यू झाला आहे. भिंत कोसळून पाच जणांचा तर, एक जण नदीत बुडून मृत्युमुखी पडला आहे. जहानाबाद जिल्ह्याजवळ एका तीनवर्षीय मुलीचा भिंत कोसळून मृत्यू झाला. रविवारपर्यंत राज्यात १८ जणांचा मृत्यू झाला होता. आतापर्यंत राज्यात ३० जणांचा मृत्यू झाल्याचेही वृत्त आहे. उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांच्या निवासस्थानाला पाण्याने घेरले आहे. (वृत्तसंस्था)
तुरुंगात पाणी ; ९०० कैद्यांचे स्थलांतरण
बलिया : उत्तर प्रदेशातील बलियामध्ये गंगा नदीचे पाणी तुरुंगात शिरल्याने ९०० कैद्यांना स्थलांतरित करण्यात आले आहे. या कैद्यांना सुरक्षित स्थलांतरित करण्यासाठी चार उपअधीक्षक, २० एसएचओ, ८० उपनिरीक्षक, १४६ हेड कॉन्स्टेबल आणि ३८० कॉन्स्टेबल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
तुरुंग परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. ९०० पैकी ५०० कैद्यांना आझमगडच्या तुरुंगात, तर उर्वरित कैद्यांना आंबेडकरनगरमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे.
बलियाच्या तुरुंगात बराकीमध्ये तीन फुटांपर्यंत पाणी साचले आहे. त्यामुळे या कैद्यांना स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला.