राजनाथसिंग, जेटली आणि व्यंकय्या ठरवणार देशाचा 14वा राष्ट्रपती
By admin | Published: June 12, 2017 07:27 PM2017-06-12T19:27:36+5:302017-06-12T19:27:36+5:30
राजनाथसिंग, अर्थमंत्री अरुण जेटली आणि नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांची त्रिसदस्य समिती नियुक्त केली
ऑनलाइन लोकमत/सुरेश भटेवरा
नवी दिल्ली, दि. 12 - विविध राजकीय पक्षांशी चर्चा करून राष्ट्रपतीपदाची यंदाची निवडणूक सर्वसंमतीने व्हावी या प्रयत्नासाठी, तसेच सत्ताधारी आघाडीचा राष्ट्रपतीपदाचा उमेदवार ठरवण्यासाठी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी गृहमंत्री राजनाथसिंग, अर्थमंत्री अरुण जेटली आणि नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांची त्रिसदस्य समिती नियुक्त केली आहे. लहान मोठ्या तमाम राजकीय पक्षांशी चर्चा आणि विचारविनिमय करून शक्यतो सर्वसंमतीचा उमेदवार ठरवण्यासाठी ही समिती प्रयत्न करणार आहे.
राजधानी दिल्लीतल्या विद्यमान राजकीय घडामोडींमध्ये राष्ट्रपतीपदाची निवडणूक सर्वाधिक महत्त्वाची असल्याने या काळात अमित शाह यांचे वास्तव्य दिल्लीत असणे अत्यावश्यक आहे. साहजिकच सोमवारपासून सुरू होणारा आपला उत्तराखंडाचा दौरा शाह यांनी रद्द केला आहे. आंध्र प्रदेशात 15 व 16 जुलै रोजी होऊ घातलेली भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठकही पुढे ढकलण्यात येते आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचे मतदान 17 जुलै रोजी आणि मतमोजणी 20 जुलै रोजी आहे. त्यामुळे साऱ्याच राजकीय नेत्यांचे जून आणि जुलैतल्या कार्यक्रमांचे वेळापत्रक बदलले आहे.
काँग्रेस, डावे पक्ष, जद(यु), राजदसह बहुतांश विरोधी पक्षांच्या दिल्लीतल्या सध्याच्या हालचाली लक्षात घेता, विरोधकांतर्फे एक सर्वमान्य उमेदवार मैदानात उतरवण्याची तयारी सुरू झाली आहे. साहजिकच यंदाही निवडणूक अटळ दिसते आहे. अशा वातावरणात सत्ताधारी पक्षाच्या त्रिसदस्य समितीने सर्वपक्षीय संमती व सामंजस्यासाठी चालवलेले प्रयत्न केवळ उपचारापुरता राजकीय शिष्टाचार ठरणार आहे. प्रस्तुत निवडणुकीसाठी 14 जून रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होईल. जून अखेरपर्यंत उमेदवार ठरणार असल्याने महिनाभरातल्या घडामोडींमध्ये देशाचा 14वा राष्ट्रपती नेमका कोण? याबाबतची उत्कंठा मात्र शिगेला पोहोचली आहे.