तेलंगणाच्या विकासासाठी मतदारांचा रामबाण 'इलाज'; १५ डॉक्टर झाले आमदार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2023 06:35 PM2023-12-05T18:35:23+5:302023-12-05T18:38:28+5:30

उच्चशिक्षित उमेदवार विजयी झाल्यामुळे आगामी काळात मतदारसंघांचा विकास होण्यास आणखी मदत होईल, असा विश्वास मतदारांनी व्यक्त केला आहे.

15 doctor candidates win in Telangana Assembly polls | तेलंगणाच्या विकासासाठी मतदारांचा रामबाण 'इलाज'; १५ डॉक्टर झाले आमदार

तेलंगणाच्या विकासासाठी मतदारांचा रामबाण 'इलाज'; १५ डॉक्टर झाले आमदार

हैदराबाद : केसीआर यांच्या नेतृत्वाखालील भारत राष्ट्र समितीचा पराभव करत तेलंगणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. सलग दोन टर्म सत्तेत असणाऱ्या बीआरएसला काँग्रेसने अस्मान दाखवल्याने या निवडणूक निकालाची देशभर चर्चा झाली. ही निवडणूक चर्चेत येण्याचं आणखी एक कारण ठरलं आणि ते म्हणजे या राज्यात आमदार म्हणून निवडून आलेल्या डॉक्टरांची संख्या. तेलंगणा विधानसभा निवडणुकीत तब्बल १५ डॉक्टर विजयी झाले आहेत. विशेष म्हणजे यातील एकही उमेदवार हा शहरी भागातील नव्हता.

तेलंगणा विधानसभा निवडणुकीत तीन ऑर्थोपेडिक डॉक्टर विरोधी उमेदवारांना चितपट करत निवडून आले. उच्चशिक्षित उमेदवार विजयी झाल्याने आगामी काळात मतदारसंघांचा विकास होण्यास आणखी मदत होईल, असा विश्वास मतदारांनी व्यक्त केला आहे.

कोणत्या मतदारसंघात डॉक्टर झाले आमदार?

सर्जन असलेले डॉ. तेल्लम वेंकट राव (बीआरएस) भद्राचलम मतदारसंघातून निवडून आले आहेत. निजामाबाद ग्रामीण मतदारसंघातून विजयी झालेले डॉ. आर. भूपती रेड्डी (काँग्रेस) हे प्रसिद्ध अस्थिव्यंग डॉक्टर आहेत. जनरल सर्जनमध्ये डॉ. रामचंद्र नाईक (दोरनाकल), डॉ. वामशी कृष्णा (अचंपेट), डॉ. मुरली नाईक (महबूबाद), डॉ. के. सत्यनारायण (मानकोंडुरू) यांचा समावेश आहे. मेडकमधून निवडून आलेले आणि पहिल्यांदाच आमदार झालेले डॉ. मायनामपल्ली रोहित यांनी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली. काँग्रेसच्याच तिकिटावर विवेक वेंकटस्वामी हे चेन्नूर मतदारसंघातून विजयी झाले आहेत.

दरम्यान, तेलंगणा विधानसभेच्या ११९ जागांपैकी काँग्रेसने ६४ जागा मिळवल्या असून बीआरएसला ३९ जागांवर यश आलं आहे. तसंच भाजपने आठ आणि एमआयएमने सात जागांवर विजय मिळवला आहे. तसंच एका जागेवर सीपीआय उमेदवाराला यश मिळालं आहे.

Web Title: 15 doctor candidates win in Telangana Assembly polls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.