१५ लाख कोटींचे राष्ट्रीय महामार्ग अन् खादीला जागतिक बाजारपेठ मिळवून देणार - गडकरी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2019 03:27 AM2019-06-06T03:27:23+5:302019-06-06T03:27:41+5:30
माझ्या खात्यांनी खर्च केलेल्या १७ लाख कोटी रकमेतील ११ लाख कोटी रुपये एकट्या राष्ट्रीय महामार्गांच्या बांधणीवर खर्च झाले आहेत.
नवी दिल्ली : आगामी काळात १५ लाख कोटी रुपये खर्चाचे राष्ट्रीय महामार्ग बांधणीचे प्रकल्प हाती घेण्याचा केंद्रीय भुपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांचा विचार आहे, तसेच खादी, सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योजकांच्या उत्पादनांचा जागतिक बाजारपेठ मिळवून देण्याचेही त्यांनी ठरविले आहे.
नितीन गडकरी हे आता त्यांच्याकडे असलेल्या खात्याचे सलग दुसऱ्यांदा मंत्रीपद भूषवत आहेत. गडकरी म्हणाले की, देशात राष्ट्रीय महामार्ग कशा प्रकारे बांधायचे याचा आराखडा तयार आहे. राष्ट्रीय महामार्ग बांधणीच्या आगामी प्रकल्पात २२ ग्रीन एक्स्प्रेसवेज आहेत. जे प्रकल्प काही कारणाने रखडले आहेत, त्यांना येत्या १०० दिवसांत चालना देण्यात येईल. एनडीए सरकारच्या पहिल्या कार्यकाळात माझ्याकडे भूपृष्ठ वाहतूक, राष्ट्रीय महामार्ग, जलस्रोत, गंगा शुद्धीकरण, अशा खात्यांचा भार होता. त्यावेळी माझ्या खात्यांनी खर्च केलेल्या १७ लाख कोटी रकमेतील ११ लाख कोटी रुपये एकट्या राष्ट्रीय महामार्गांच्या बांधणीवर खर्च झाले आहेत.
प्रकल्पांमधील अडचणी अजून कायम
नितीन गडकरी म्हणाले की, लोकसभा निवडणुकांत मतदारांनी पक्ष, जात-पात, धर्म, जातीयवाद यांच्या भिंती ओलांडून मतदान केले. नरेंद्र मोदी यांना सलग दुसऱ्यांदा पंतप्रधानपदी बसविले. भ्रष्टाचार करणाºया तसेच काळा पैसा बाळगणाºयांना मोदी सरकारने नोटाबंदी करून इशारा दिला. केंद्र सरकारने गृहबांधणी, स्वयंपाकाचा गॅस, वीज, आरोग्य तपासणी आदींसंदर्भात राबविलेल्या योजनांमुळे सामान्य जनतेला मोठा फायदा झाला. देशामध्ये विविध कारणांनी २२५ प्रकल्प अडकून राहिले होते. त्यातील अडचणी दूर केल्या आहेत. फक्त २० ते २५ प्रकल्पांमधील अडथळे दूर करणे बाकी आहे.