डिसेंबरपर्यंत दीड लाख कि.मी. लांबीचे महामार्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2015 11:28 PM2015-09-02T23:28:37+5:302015-09-02T23:28:37+5:30
येत्या तीन महिन्यांत महामार्गांची लांबी वाढवून ती दीड लाख किलोमीटरपर्यंत करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, अशी ग्वाही मार्ग परिवहन व महामार्गमंत्री नितीन गडकरी
नवी दिल्ली : येत्या तीन महिन्यांत महामार्गांची लांबी वाढवून ती दीड लाख किलोमीटरपर्यंत करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, अशी ग्वाही मार्ग परिवहन व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी दिली. देशाच्या पायाभूत विकासासाठी सरकार प्रतिबद्ध असल्याचेही ते म्हणाले.
‘सियाम’ या वाहन उत्पादनकर्त्यांच्या संघटनेच्या वार्षिक संमेलनप्रसंगी ते बोलत होते. देशाची पायाभूत चौकट आमूलाग्र बदलण्याचा सरकारचा इरादा आहे. येत्या तीन महिन्यांत आम्ही महामार्गांची लांबी १.५ लाख कि.मी.पर्यंत नेऊ. याशिवाय दोन वर्षांत १० हजार कि.मी.च्या महामार्गांचे रुंदीकरण करून तो चौपदरी करू, अशी ग्वाही गडकरींनी यावेळी दिली. सध्या दररोज १४ कि.मी. मार्गाचे बांधकाम होत आहे. यापूर्वी हे प्रमाण केवळ २ कि.मी. प्रतिदिन एवढे होते. यावरून पायाभूत विकासाबाबत सरकार किती गंभीर आहे, ते कळते, असा दावाही त्यांनी केला. येत्या महिन्यात चार हजार कोटी रुपयांच्या ‘मेट्रिनो’ सार्वजनिक परिवहन योजनेवर काम सुरू होत आहे. याद्वारे दिल्लीतील लोक रोप-वेवरील चालकरहित पोड्सवरून प्रवास करू शकतील. मेट्रिनोवर प्रतिकिलोमीटर ५० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. याउलट मेट्रोच्या एक कि.मी.च्या मार्गावरील खर्च ३५० कोटी रुपयांच्या घरात आहे, असेही त्यांनी सांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क)