देशात दरवर्षी कॅन्सरचे १५ लाख नवे रुग्ण, दरवर्षी ८ लाख लोकांचा होत आहे मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2020 04:25 AM2020-03-16T04:25:59+5:302020-03-16T04:28:06+5:30
२०१६ ते २०१८ या काळात २३ लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. यातील सर्वाधिक ८ लाख १ हजार ३७४ कॅन्सरपीडितांचा मृत्यू २०१८ मध्ये झाला आहे.
- नितीन अग्रवाल
नवी दिल्ली : देशात कॅन्सरचे रुग्ण दरवर्षी वेगाने वाढत आहेत. दरवर्षी १५ लाख लोक कॅन्सरच्या विळख्यात सापडत आहेत. मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या ८ लाख प्रतिवर्ष झाली आहे. सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये दिसून येत आहेत.
आरोग्य व कुटुंबकल्याणमंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी सांगितले की, २०१६ ते २०१८ या काळात २३ लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. यातील सर्वाधिक ८ लाख १ हजार ३७४ कॅन्सरपीडितांचा मृत्यू २०१८ मध्ये झाला आहे. चौबे यांनी लोकसभेत सांगितले की, केवळ २०१८ मध्ये कॅन्सरपीडितांची संख्या ४३ लाख ६३ हजार आहे. एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात त्यांनी सांगितले की, २०१८ मध्ये कॅन्सरचे १५ लाख ८६ हजार ५७१ रुग्ण नोंद झाले आहेत.
याशिवाय वर्ष २०१७ मध्ये १५ लाख १७ हजार आणि वर्ष २०१६ मध्ये १४ लाख ५१ हजार रुग्ण समोर आले आहेत. सर्वाधिक रुग्ण उत्तर प्रदेशात आढळून आले आहेत. त्यानंतर कॅन्सरपीडितांची सर्वाधिक संख्या बिहार आणि महाराष्ट्रात आहे. कॅन्सरवरील उपाययोजनांबाबत चौबे यांनी सांगितले की, राष्ट्रीय कॅन्सर नियंत्रण कार्यक्रम १९७५ मध्ये सुरू करण्यात आला होता. त्यानंतर याला राष्ट्रीय कॅन्सर, मधुमेह, हृदयरोग नियंत्रण कार्यक्रम बनविण्यात आले. याअंतर्गत लवकरात लवकर निदान, उपचार यासाठी देशात जिल्हा स्तरावर ६१६ क्लिनिक आणि सामुदायिक आरोग्य केंद्रांच्या ठिकाणी ३,८२७ क्लिनिक स्थापन करण्यात आले. याशिवाय केमोथेरपीसाठी २१४ डे केअर केंद्रे बनविण्यात आली आहेत.
रोगावर मात करण्यासाठी उपाययोजना
कॅन्सरच्या तिस-या स्टेजच्या देखभालीसाठी एक योजना सुरू करण्यात आली आहे. यानुसार १९ राज्य कॅन्सर संस्था आणि २० कॅन्सर केंद्रांची स्थापना करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे.
याशिवाय पंतप्रधान आरोग्य सुरक्षा योजनेंतर्गत एम्स आणि दुसºया संस्थांमध्येही शास्त्रीय अभ्यासावर लक्ष दिले जात आहे. हरयाणात राष्ट्रीय कॅन्सर संस्था आणि कोलकात्यात चितरंजन राष्ट्रीय कॅन्सर संस्थेचा विकास करण्यात येत आहे.